Delhi Crime: कठीण पेपर, ब्लेड अन् ती...; सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनाही बसला धक्का

Fake Molestation Kidnapping Case: दिल्लीमधील या प्रकरणानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून पाहिले असता त्यांना या प्रकरणाबद्दल वेगळीच शंका वाटली आणि त्यांनी तपासाचा रोख तक्रार करणाऱ्या मुलीच्या दिशेनेच वळवला.

Updated: Mar 21, 2023, 06:27 PM IST
Delhi Crime: कठीण पेपर, ब्लेड अन् ती...; सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनाही बसला धक्का title=
Delhi Girl Student

Delhi Crime Case: दिल्लीमधील भजनपुरा येथील एका 10 वीच्या विद्यार्थीनीने एसएसटीच्या परीक्षेमधील पेपर मनासारखा गेला नाही म्हणून धक्कादायक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपली छेड काढण्यात आली आणि आपलं अपहरण करण्यात आल्याचा बनाव या मुलीने केला. इतक्यावरच ही मुलगी थांबली नाही तर तिने खरोखर असं घडलं आहे हे दाखवण्यासाठी स्वत:च स्वत:च्या हातावर जखमाही करुन घेतल्या. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने छेडछाड, अपहरण, हाणामारी, धारदार हत्याराने हल्ला केल्याप्रकरणाबरोबरच पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास केला असता त्यांना छेडछाड केल्याचे आणि अपहरणाचे कोणतेही पुरावे सापडले नाही. 

...अन् सत्य समोर आलं

पोलिसांनी या मुलीच्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये तिचं समोपदेशन केलं. त्यानंतर सत्य समोर आलं. 14 वर्षांच्या या मुलीला परीक्षेत पेपर मनासारखा गेला नाही. त्यामुळेच आपण हा बनाव केल्याचं या मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये मान्य केलं. मुलीने हा खुलासा केल्यानंतर एका अर्थाने पोलिसांचा जीव भांड्यात पडला. आता पोलिसांनी हे प्रकरण बंद करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

फोन आला अन्...

ईशान्य दिल्लीचे डीसीपी जॉय टिर्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 मार्च रोजी दुपारी ज्योती नगर पोलीस स्थानकामध्ये एक फोन आला. फोनवरील व्यक्तीने एका शाळकरी मुलीला काही अज्ञात लोकांनी अपहरण करुन जखमी केल्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासानंतर हे प्रकरण भजनपुरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असल्याने या विद्यार्थीनीला तिकडेच पाठवण्यात आलं. 

मुलीने काय सांगितलं?

या मुलीने पोलिसांना ती आपल्या कुटुंबाबरोबर मुस्तफाबाद परिसरात राहते असं सांगितलं. बुधवारी ती पेपर देण्यासाठी यमुना विहारमधील शाळेत गेली होती. पेपर दिल्यानंतर ती शाळेतून निघाल्यानंतर काही अंतरावर 3 ते 4 तरुणांनी तिला अडवलं आणि तिची छेड काढली. विरोध केल्यानंतर एका मुलाने आपल्या हातावर वार केल्याचा दावा या मुलीने केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीने ती बेशुद्ध पडल्याचं सांगितलं. शुद्धीवर आल्यानंतर आपण ज्योति नगरमधील निर्जनस्थळी होतो असंही या मुलीने सांगितलं. एका महिलेच्या मदतीने आपण कुटुंबियांशी संपर्क केला आणि स्थानिक पोलिसांना माहिती कळवल्याचं या मुलीने सांगितलं. मुलीची स्थिती पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तातडीने तपास सुरु केला. सीसीटीव्हीच्या मदतीने तपास केला असता प्रकरणात काहीतरी काळंबेरं असल्याची शंका पोलिसांना आली.

ब्लेड घेतलं अन्...

त्यानंतर या विद्यार्थिनीने स्वत: या प्रकरणाचा खुलासा करताना आपण हा कट रचल्याचं सांगितलं. आपल्याला पेपर चांगला गेला नाही म्हणून नातेवाईकांच्या भितीने आपण हा सारा प्रकार केल्याचं या मुलीने सांगितलं. ही मुलगी जवळच्या दुकानात गेली. तिथे काही खाण्याच्या गोष्टींबरोबरच तिने एक ब्लेडही विकत घेतलं. त्यानंतर एका ठिकाणी बसून तिने स्वत:च्या हातावर ब्लेडने वार केला. त्यानंतर ती ज्योति नगरला पोहोचली आणि तिथे एका महिलेच्या मदतीने कुटुंबियांना फोन केला. या मुलीने खुलासा केल्यानंतर तिला जिल्हा न्यायादंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. मुलीने स्वत:ची चूक स्वीकारल्यानंतर समोपदेशन करुन तिला सोडून देण्यात आलं. मात्र मुलीने ज्या प्रकारे कट रचला आणि अंमलात आणला ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.