Crime News: कर्नाटकमध्ये (Karnataka) पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून भावाची निर्घृणपणे हत्या (Murder) केली होती. तब्बल आठ वर्षांनी या हत्येचा उलगडा झाला आहे. यानंतर पोलिसांनी 31 वर्षीय तरुणीला बेड्या ठोकल्या. तरुणीन हत्या केल्यानंतर आपल्या लिव्ह-इन पार्टनरच्या (Live In Partner) मदतीने मृतदेहाचे तुकडे करुन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाने आपल्या बहिणीच्या नात्याला विरोध केला होता. यानंतर बहिणीने प्रियकराच्या मदतीने त्याची निर्घृणपणे हत्या केली आणि नंतर त्याच्या शरिराचे तुकडे केले. यानंतर त्यांनी आपलं घरं सोडलं होतं. तसंच मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले होते.
मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास बंद केला होता. मात्र याप्रकरणी काही पुरावे हाती लागल्यानंतर पोलिसांनी पुन्हा तपास सुरु केला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची माहिती मिळवली आणि त्यांना अटक केली. आरोपींची ओळख 31 वर्षीय भाग्यश्री सिद्दप्पा आणि शंकरप्पा तलवार अशी पटली आहे. हत्येनंतर दोघांनीही लग्न केलं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री आणि तिचा भाऊ निंगाराजू सिद्धप्पा पुजारी जिगनी एका फॅक्टरीत काम करत होते. दोघेही एका भाड्याच्या घरात राहत होते. भाग्यश्रीचे शंकरप्पासोबत प्रेमसंबंध होते. शंकरप्पा विवाहित होता. निंगाराजूचा या नात्याला विरोध होता. यानंतर भाग्यश्री आणि शंकरप्पा यांनी निंगाराजूला रस्त्यातून हटवण्याची योजना आखली.
दोघांनीही त्याच्या हत्येचा कट आखला आणि हत्या केली. पोलिसांना शरिराचे तुकडे भरलेली बॅग सापडल्यानंतर या हत्येचा खुलासा झाला होता. पोलिसांना डॉक्टरांचं एक पत्रक सापडलं होतं, ज्याच्या आधारे ते आरोपींच्या घरी पोहोचले होते. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ते आरोपी काम करत असलेल्या कारखान्यातही पोहोचले होते. मृताच्या कुटुंबाशी संपर्क साधत त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली होती.
आरोपींचा ठावठिकाणा सापडत नसल्याने पोलिसांनी कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. यादरम्यान ते आरोपींवर लक्ष्य ठेवून होते. जुने रेकॉर्ड तपासत असताना पोलिसांनी आरोपी नाशिकमधील एका फॅक्टरीत काम करत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस तिथे पोहोचले. पण आरोपीने नोकरी बदलली होती. पोलिसांनी पुन्हा तपास सुरु केला आणि अखेर आरोपींना बेड्या ठोकल्या.