कृष्णात पाटील, मुंबई : कोरोनाच्या नव्या विषाणूवर कोरोनाची लस प्रभावी ठरेल की नाही याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. लस उत्पादक कंपन्यांनीही लसीत आवश्यक ते बदल करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.
कोरोनाच्या नव्या शक्तीशाली विषाणू सापडल्यानं जगभरातल्या आरोग्य यंत्रणांचं धाबं दणाणलं आहे. कोरोना प्रतिबंधक लसींना नवा विषाणू जुमानणार की नाही यावर आता चर्चा सुरु झालीय. कोरोनाचा नवा विषाणू त्याचाच उपप्रकार असल्यानं नवी लस नक्कीच उपयोगी पडेल असा दावा करण्यात आला आहे.
कोरोनाचा विषाणू जसे नवनवे अवतार घेईल तशा कोरोनाच्या लसींमध्येही बदल करावा लागणार आहे.
कोरोनाचा नवा विषाणू सापडल्या सापडल्या जगभरातील लस उत्पादक कंपन्यांनी नव्या विषाणूवरही उपकारक अशा लसीच्या संशोधनाला सुरुवात केली आहे. सध्याची उपलब्ध असणारी लस, नव्या प्रकारच्या कोरोनावरही प्रभावी ठरेल असा आम्हाला विश्वास आहे. पण, गरज पडलीच, मेसेंजर तंत्रज्ञानाचा वापर करुन आम्ही थेट नवीन प्रकारच्या व्हायरससाठी आवश्यक बदल करुन सहा आठवड्यात नवीन लस उपलब्ध करुन देऊ शकतो. असं फायझर बायोंटेकनं म्हटलं आहे.
नव्या विषाणूचा सामना करण्यासाठी पुन्हा नव्यानं तयारी करावी लागणार की काय असा सवाल उपस्थित झाला आहे.