नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाला (Corona Vaccine) सुरुवात झाल्या क्षणापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) लसीकरण प्रक्रियेतील आकडेवारी सातत्यानं नागरिकांसमोर मांडली आहे. इतकंच नव्हे, तर देशात दिल्या जाणाऱ्या कोरोना लसींबाबत जागरुकता पसरवण्यासाठीही आरोग्य मंत्रालय आणि सर्वच आरोग्य यंत्रणा प्रत्नशीलही आहेत. पण, असं असतानाही लसीबाबतच्या काही शंका मात्र अनेकांच्याच मनात काही प्रश्न निर्माण करुन जात आहेत. त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे कोरोनाच्या लसीमुळे वंध्यत्वाचा धोका उदभवतो का? (Corona Vaccination No scientific evidence to prove COVID vaccine causes infertility clears Health Ministry)
आरोग्य मंत्रालयानंच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. पुरुष किंवा महिलांमध्ये कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीमुळे कोणत्याही प्रकारचा वंध्यत्वाचा धोका उदभवत नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. National Expert Group on Vaccine Administration चा दाखला देत स्तनदा मातांसाठीही लस सुरक्षित असल्याच्या मुद्यावर आरोग्य मंत्रालयानं प्रकाश टाकला.
स्तनदा मातांसाठी कोरोना लसीकरण खरंच सुरक्षित आहे का आणि लसीकरणामुळं पुरुष आणि महिलांमध्ये वंध्यत्वाचा धोका उद्भवतो अशा आशयाची काही वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली, ज्यामुळं अनेक चर्चांना आणि शंकांना वाव मिळाला. अखेर आरोग्य मंत्रालयानं स्वतंत्र पत्रक प्रसिद्ध करत याबाबतचं चित्र स्पष्ट केलं.
देशात सध्या उपलब्ध असणाऱ्या सर्व लसींची सर्वप्रथम प्राणी आणि त्यानंतर मानवी चाचणी घेण्यात येते त्यानंतर या लसी वापरात आणल्या जातात. सध्या अशा कोणत्याही लसीचे दुष्परिणाम दिसून येत नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या या पत्रकामुळं लसीबाबत मनात भीती असणाऱ्या अनेक नागरिकांना त्यांच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत.
लसीबाबत असणाऱ्या सर्व शंका दूर करत NEGVAC नं स्तनदा मातांसाठीही लस सुरक्षित असल्याचा मुद्दा अधोरेखित केला. शिवाय लस घेतल्यानंतर किंवा लस घेण्यापूर्वी मातांनी बाळाला स्तनपान करणं थांबवू नये असा सल्लाही दिला आहे.
संबंधित बातम्या :
Covid 19 | राज्यांनी 'या' मुद्द्यांवर अधिक लक्ष द्यावे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे निर्देश
गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी लस सुरक्षित की धोकादायक? केंद्र सरकारने काय म्हटलं?