लखनऊ : उत्तर प्रदेशच्या राजकारणात नव्या नव्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील इटावा आणि मेनपुरी मतदारसंघ चर्चेत आहेत. इटावाच्या जसवंत नगर मतदारसंघातून शिवपाल सिंह यादव आणि मेनपुरीच्या करहल मतदारसंघातून अखिलेश यादव निवडणुकीच्या मैदानात आहेत. पण काँग्रेसने आता असा दाव खेळला आहे. ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
काँग्रेसने या दोन्ही जागेवरुन आपले उमेदवार मागे घेतले आहेत. त्यामुळे काँग्रेसचा कोणताच उमेदवार मैदानात नसणारे. त्यामुळे अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्या विरोधातील उमेदवार काँग्रेसने मागे का घेतले या प्रश्न अनेकांना पडला आहे.
करहल आणि जयवंतनगर दोन्ही जागा सपाचा बालेकिल्ला मानला जातो. दुसरीकडे भाजपने या दोन्ही जागांवर सपाला तगडं आव्हान देण्यासाठी मजबूत उमेदवार दिले आहेत.
काँग्रेसने करहल मतदारसंघातून ज्ञानवती यादव यांना उमेदवारी घोषित केली होती. पण त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्याच नाही. त्यामुळे काँग्रेस आधीच बॅकफूट गेल्याची टीका होऊ लागली आहे. केंद्रीय कायदा राज्य मंत्री एसपी सिंह बघेल यांनी करहल मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. अखिलेश यादव यांना ते आव्हान देणार आहे. सध्या एसपी सिंह बघेल आग्रा येथून खासदार देखील आहेत.
शिवपाल सिंह यादव यंदा सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. शिवपाल सिंह यादव यांच्याविरोधात भारतीय जनता पक्ष आणि बहुजन समाज पक्षासह 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.