Tamil Nadu Child Dies Of Snake Bite: तामिळनाडूमधील (Tamil Nadu) वेल्लोरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका दीड वर्षांच्या चिमुकलीचा साप चावल्याने (Snake Bite) मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रस्त्यांची अवस्था नीट (Road Condition) नसल्याने या मुलीला वेळेत रुग्णालयात दाखल न करता आल्याने तिचा मृत्यू झाला. रुग्णवाहिकेने रस्ता खराब असल्याने या मुलीला आणि तिच्या आईला अर्ध्या रस्त्यातच सोडून दिलं. त्यानंतर ही महिला आपल्या मुलीला वाचवण्यासाठी 6 किलोमीटरपर्यंत पायपीट करत गेली. मात्र तिच्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि वाटेतच तिच्या मुलीचा मृत्यू झाला.
समोर आलेल्या माहितीनुसार, 18 महिने वय असलेल्या धनुष्का नावाच्या मुलीला साप चावला. यानंतर धनुष्काच्या आई-वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीने वेल्लोरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये घेऊन जाण्याचं ठरवलं. मात्र वाटेतच या धनुष्काचा मृत्यू झाला. धनुष्काच्या नातेवाईकांनी रस्त्याची दुरावस्था झाल्याने वेळेत रुग्णालयात पोहचता आलं नाही आणि त्यामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. रस्ता नीट असता आणि वेळेत धनुष्काला घेऊन रुग्णालयात पोहचता आलं असतं तर योग्य उपचारांच्या मदतीने मुलीचा जीव वाचला असता असा दावा नातेवाईकांनी केला आहे.
यासंदर्भात वेल्लोरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देताना एक छोटी रुग्णवाहिका जवळच उपलब्ध होती. या मुलीच्या नातेवाईकांनी येथील स्थानिक आशा कार्यकर्त्यांना संपर्क केला असता तर मुलीला प्राथमिक उपचार मिळाले असते आणि कदाचित तिचा जीव वाचला असता. धनुष्काच्या पालकांनी आशा कार्यकर्त्यांशी संपर्क केला नाही किंवा संपर्क करण्याचा प्रयत्नही केला नाही असा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. मृत मुलीच्या पालकांनी जवळच्या सरकारी कर्मचाऱ्यांना म्हणजेच आशा कार्यकर्त्यांशी संपर्क करण्याऐवजी बाईकवरुन मुलीला घेऊन जाण्याचा निर्णय घेतल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. "या भागामध्ये रस्ता बनवण्याचा काम सुरु आहे. या ठिकाणी 1500 लोकांची वस्ती आहे. वन विभागाकडे रस्तेबांधणीसाठी परवानगीचा ऑनलाइन अर्ज केला आहे," असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
हे प्रकरण समोर आल्यानंतर यावरुन स्थानिक स्तरावरील राजकारण सुरु झालं आहे. तामिळनाडूमधील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख के. अन्नामलाई यांनी ही घटना फारच दुर्देवी असल्याचं म्हणत प्रशासनावर टीका केली आहे. या मुलीच्या मृत्यूसाठी राज्य सरकारच जबाबदार असल्याचं अन्नामलाई यांनी म्हटलं आहे. "वेल्लोरमधील दीड वर्षाच्या मुलीचा साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना फारच धक्कादायक आहे. खराब रस्त्यांमुळेच या मुलीला वेळेत रुग्णालयात दाखल करता आलं नाही. रस्त्याची दुर्वास्था असल्याने अशाप्रकारे लहान मुलीचा मृत्यू होणं फारच खेदजनक आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे तिच्या आई वडिलांना तिला घेऊन अनेक किलोमीटर पायपीट करुनही मुलीला वाचवता आलं नाही. हे कोणाच्याही नशिबात येऊ नये," असं अन्नामलाई म्हणाले.