Business News : देशातील व्यवसाय क्षेत्राची चर्चा सुरु होते तेव्हातेव्हा काही नावं प्रकर्षानं समोर येतात. या नावांमध्ये अदानी आणि अंबानींचा उल्लेखही सर्रास होतो. अधिकृत आकडेवारी आणि काही अहवालांच्या माहितीनुसार या दोन्ही व्यावसायिकांच्या अख्तयारित येणाऱ्या विविध उद्योगधंद्यांच्या माध्यमातून त्यांच्या कमाईचा आकडा सातत्यानं वाढताना दिसतो. पण, या दोन्ही धनाढ्य व्यक्तींच्या श्रीमंतीला सध्या एक व्यक्ती आव्हान देताना दिसत आहे.
अंबानी आणि अदानी यांना पिछाडीवर टाकणाऱ्या या व्यक्तीच्या कंपनीनं 5 दिवसांमध्ये तब्बल 47000 कोटी रुपये इतकी कमाई केसी आहे. मागील आठवड्यामध्ये कंपनीच्या शेअरमध्ये आलेली तेजी पाहता कमाईचे हे आकडे समोर आले आहेत. सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन दिवसांमध्ये विक्रमी कमाई करणारी ही कंपनी आहे, भारती एअरटेल. सुनील भारती मित्तल यांच्या मालकीच्या या कंपनींन नुकतीच 47194.86 कोटी रुपयांची कमाई केली. या तुलनेत अंबानींच्या रिलायन्स उद्योग समुहानं 13396.42 कोटी रुपये इतकी कमाई केली.
मागील आठवड्यामध्ये भारती एअरटेलच्या या शेअरमध्ये 5 टक्क्यांहून अधिक तेजी पाहायला मिळाली. शुक्रवारी हा शेअर 1584 रुपयांवर बंद झाला. शेअर बाजारात आलेल्या या तेजीमुळं कंपनीचा मार्केट कॅप वाढला आणि याच कारणामुळे 5 दिवसांत कंपनीनं विक्रमी कमाई केली.
कंपनीची मुख्य वैशिष्ट्य आणि मित्तल यांची एकूण कंपनी
भारती एअरटेल टेलिकम्युनिकेशन ही कंपनी देशभरात मोबाईल सर्विस, ब्रॉडबँड,डीटीएच सर्विस देते. याशिवाय ही कंपनी डिजिटल टेलिव्हीजन सर्विसमध्येही सक्रिय असून, देशभरात तिचे अनेक आऊटलेट आहेत. या कंपनीचे मालक ,सुनील भारती मित्तल हे जगातील 79 वे श्रीमंत व्यक्ती असून, अधिकृत आकडेवारीनुसार त्यांची एकूण संपत्ती 24.7 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 2 लाख कोटी रुपये इतकी आहे. सर्वाधिक श्रीमंत भारतीयांच्या यादीत मित्तल आठव्या स्थानी येतात.