PM Modi Mother Heeraben Modi Death : मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री, हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. खुद्द पंतप्रधानांनीच (PM Modi) शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ट्विट करत आपल्या आईच्या निधनाची माहिती दिली. यावेळी त्यांनी हिराबा यांचा एक फोटोही शेअर केला. दरम्यान, मातोश्रींच्या निधनाचं वृत्त समोर येताच पंतप्रधान अहमदाबादच्या दिशेनं रवाना झाले.
'शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम...' असं लिहित आईच्या रुपात आपल्याला दिसलेल्या तपस्वी आणि मूल्यांप्रती जीवन समर्पित करणाऱ्या एका कर्मयोगिणीला त्यांनी श्रद्धासुमनं वाहिली.
#BREAKING | Prime Minister Narendra Modi's mother Heeraben Modi passed away at the age of 100. pic.twitter.com/fDAF7KvH7x
— ANI (@ANI) December 30, 2022
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम... मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
आईच्या निधनाचं वृत्त कळताच पंतप्रधान भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. हिराबा यांच्या आठवणींमध्ये ते रमले आणि भावनांच्या भरात एक आठवण देशवासियांपुढेही आणली. पंतप्रधान म्हणाले, 'आईच्या 100 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा त्या एकच गोष्ट म्हणाल्या होत्या, जी माझ्या कायम लक्षात राहील. ती गोष्ट म्हणजे बुद्धीनं काम करा आणि शुद्धीनं आयुष्य जगा'. थोडक्यात आयुष्यात कायमच बुद्धिचातुर्याचा वापर करा. पण, जीवनातील पावित्र्य गमावू नका असा संदेश हिराबा यांनी लेकाला दिला होता.
1923 मध्ये जन्मलेल्या हिराबा यांनी 18 जून रोजी वयाची 100 वर्षे पूर्ण केली होती. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मार्च रोजी गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना आईची भेट घेतली होती. तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यानही पंतप्रधान त्यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी त्यांच्या आईची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. हिराबा यांचा प्रत्येक शब्द, त्यांचे उपदेश पंतप्रधानांसाठी आधार होते.