नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असं चित्र आहे.
दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळतांना दिसत आहे. अजून दोन्ही राज्यांमधील निकाल हाती आलेला नाही. पण देशभरात भाजपचे कार्यकर्ते जल्लोष करत आहेत.
हिमाचल आणि गुजरातमध्ये मोदी फॅक्टरमुळेच विजय मिळाल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वेळापूर्वी विक्ट्रीचा इशारा देखील केला.
दिल्ली, अहमदाबाद, भोपाळ आणि शिमलामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. गुजरातमध्ये लोकं ढोकळा, फाफडा सारख्या स्थानिक पदार्थांनी विजय साजरा करत आहेत. तर देशभऱात फटाके फोडून आणि ढोल ताशाच्या गजरात विजय साजरा केला जात आहे.
गुजरात विधानसभा निकालामध्ये आतापर्यंत भाजप १०२ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ७३ जागांवर आघाडीवर आहे. भाजपचे मुख्यमंत्री विजय रूपानी हे विजयी झाले आहेत. पण राजकोट वेस्टमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांना चांगलीच झुंज दिली. मेहसाणामधून नितीन पटेल यांनी विजय मिळवला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये भाजप ४२ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस २२ जागांवर आघाडीवर आहे.