कुलपती आता राज्यपाल नव्हे तर मुख्यमंत्री होणार ?

देशभरात कुलपती म्हणून संबधित राज्यांचे राज्यपाल काम पाहतात, पण आता...

Updated: May 27, 2022, 09:42 PM IST
कुलपती आता राज्यपाल नव्हे तर मुख्यमंत्री होणार ? title=

धनंजय शेळके, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कुलपती म्हणून संबधित राज्यांचे राज्यपाल काम पाहतात. आजपर्यंत देशभरात राज्यपाल हेच कुलपती राहिलेले आहेत. संबधित राज्यातील विद्यापीठांचा कारभार त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू असतो. आता मात्र पश्चिम बंगालमध्ये यात बदल होण्याची शक्यता आहे. यावरुन पुन्हा राज्य विरुद्ध राज्यपाल आणि केंद्र सरकार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये आता कुलपती हे राज्यपाल न राहता मुख्यमंत्री राहणार आहे. पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळानं तसा ठराव संमत केला आहे. लवकर या ठरावाचं कायद्यात रुपांतर केलं जाणार आहे. विधीमंडळाची मान्यता घेऊन तो राज्यपालांना मान्यतेसाठी पाठवण्यात येईल. पण पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल आणि ममता बॅनर्जी सरकार यांच्यातला संघर्ष पाहता ते त्याला मान्यता देतात का ? ते पहावं लागणार आहे.

महाराष्ट्रात कुलगुरु नेमणुकीवरुन राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष निर्माण झाला होता. महाराष्ट्र सरकारने कुलगुरू नेमणुकीमध्ये अनेक अधिकार आपल्याकडे घेतले होते. त्यावरुन मोठा वादही निर्माण झाला होता.  ज्या ज्या राज्यांमध्ये भाजप विरोधी पक्षांची सरकारे  आहेत. तिथे असे संघर्ष पहायला मिळतात. 
 
आता पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाने कुलपतीचे अधिकार बदलण्याचा निर्णय घेतल्यामुळे यावरुन केंद्र आणि राज्य संघर्ष अटळ आहे.