मुंबई : Bank opening hours changed: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी. देशातील बँका आता एक तास आधीच सुरु होणार आहेत. आजपासून बँका 9 वाजल्यापासूनच खुल्या राहणार आहे. त्यामुळे बँक ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी अधिकचा एक तास मिळणार आहे.
बँकांचा अधिक वेळ वाढवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. कोरोनामुळे बँकांच्या वेळेत एका तासाची वेळ कमी करण्यात आली होती. पण, आता परिस्थिती सुधारत असल्याने आरबीआयने पुन्हा बँकांची वेळ वाढवली आहे. यामुळे बँकिंग व्यवहार करण्यासाठी अधिकचा एक तास ग्राहकांना मिळणार आहे.
आरबीआयने नवीन प्रणाली लागू केली आहे. मात्र, बँका बंद होण्याच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सोमवारपासून सकाळी ९ वाजता बँका सुरू होतील. त्यानुसार बँकांच्या कामकाजात आणखी एक तासाची भर पडली आहे.
विशेष म्हणजे, 2020 मधील कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, RBI ने 7 एप्रिल रोजी बाजाराच्या व्यापाराचे तास बदलले होते. व्यवहाराच्या वेळा सकाळी 10 ते दुपारी 3.30 पर्यंत बदलण्यात आल्या, त्यामुळे व्यवहाराचे तास अर्ध्या तासाने कमी करण्यात आले. पण आता परिस्थिती सामान्य होत आहे, त्यानंतर आता आरबीआयने जुने वेळापत्रक पुन्हा लागू केले आहे.
परकीय चलन बाजार आणि सरकारी रोख्यांमधील व्यवहार आता बदललेल्या वेळेनुसार शक्य होणार असल्याचेही आरबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे. 18 एप्रिल 2022 पासून, रिझर्व्ह बँकेच्या नियमनानुसार बाजारातील ट्रेडिंग सकाळी 10 वाजण्या ऐवजी आता सकाळी 9 वाजता सुरु होणार आहे.