नवी दिल्ली: भारतीय वायूदलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदचे १३० ते १७० दहशतवादी ठार झाल्याची नवी माहिती समोर आली आहे. इटलीच्या महिला पत्रकार फ्रान्सेस्का मॅरिनो यांनी 'इंडिया टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा दावा केला. त्यामुळे बालाकोटमध्ये काहीच घडले नाही, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानवर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.
फ्रान्सेस्का मॅरिनो यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर स्ट्राईकच्या झाल्यानंतर पाकिस्तानी सैन्य बालाकोटमध्ये पोहोचले. यानंतर त्यांनी जखमी दहशतवाद्यांना पाकिस्तानातील रुग्णालयांमध्ये भरती केले. स्थानिक सुत्रांनी फ्रान्सेस्का यांना दिलेल्या माहितीनुसार या एअर स्ट्राईकमध्ये १३० ते १७० दहशतवादी ठार झाले. तर उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झालेल्यांना पाकिस्तानी सैन्याच्या देररेखीखाली ठेवण्यात आले आहे. अजूनही ४५ दहशतवादी जखमी असून त्यांच्यावर पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २० दहशतवाद्यांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला, असा दावा फ्रान्सेस्का मॅरिनो यांनी केला.
यापूर्वी गिलगिट प्रांताच्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असणाऱ्या अमेरिकास्थित सेनजे हसन सिरींग या कार्यकर्त्यानेही बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये मोठ्याप्रमाणावर दहशतवादी मृत्युमुखी पडल्याचे सांगितले होते. त्यांनी एक व्हीडिओ ट्विट केला होता. या व्हीडिओत पाकिस्तानचे लष्करी अधिकारी बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये २०० दहशतवादी शहीद झाल्याचा उल्लेख केला होता. हे दहशतवादी पाकिस्तानी लष्कराची मदत करत होते. अल्लाची कृपा असल्यामुळेच त्यांना शहीद होण्याचे भाग्य लाभले. या सगळ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी लष्कर ठामपणे उभे आहे, असेही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी म्हटले होते.