चंदीगड : गुरमीत राम रहीम तुरुंगात गेल्यानंतर त्याची दहशत बाजुला टाकून अनेक जणांनी त्याच्याविरुद्ध आवाज उचललाय. यामध्ये, हरियाणाच्या तिवालामध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाचाही समावेश आहे. हे कुटुंब अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आपल्या मुलीचा शोध घेत आहे.
सिरसामध्ये डेरा सच्चा सौदा परिसरात राहून अभ्यास करणाऱ्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या कुटुंबानं आपली मुलगी बेपत्ता असल्याचं म्हटलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार, साहे बेटियां बसेरा (अल्पवयीन मुलींसाठी आश्रयस्थान) मध्ये श्रद्धा शिक्षण घेण्यासाठी दाखल झाली होती. परंतु, २००८ सालापासून त्यांचा श्रद्धाशी संपर्क होऊ शकलेला नाही.
श्रद्धाशी संपर्क करण्यासाठी त्यांनी अनेकदा डेराच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला, परंतु त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला... उलट त्यांनी या कुटुंबाला आपल्या मुलीची भेट घेण्यापासूनही रोखलं.
साहे बेटियां बसेराची पदाधिकारी पूनम हिनं त्यांना, गुरमीतला न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर श्रद्ध डेरा सोडून निघून गेल्याचं सांगितलंय.
उल्लेखनीय म्हणजे, डेरा संचालित ‘साहे बेटियां बसेरा’मध्ये जवळपास २९ मुली राहत होत्या. यापैंकी १८ अल्पवयीन मुलींना पोलीस अधिकाऱ्यांनी समजावून किशोर सुधार गृहांमध्ये धाडलंय.