H3N2 Virus On High Alert : एकीकडे कोरोनामुळे दहशत निर्माण झाली असतानाच आता देशात H3N2 व्हायरसच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. पार्श्वभूमीवर नीती आयोगानं महत्त्वाची बैठक घेत सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. H3N2 व्हायरस संसर्ग लक्षात घेता पदुच्चेरी (Puducherry) राज्याने शाळा बंदीचा (schools closed) निर्णय घेतला आहे.
पदुच्चेरीमध्ये H3N2 व्हायरसचे संक्रमण झालेले 75 रुग्ण आढळले आहेत. वाढता धोका लक्षात घेता पदुच्चेरीच्या शिक्षण मंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पदुच्चेरीमध्ये इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा 26 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षेचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
H3N2 व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा, गर्दीची ठिकाणं टाळण्याच्या सूचना नीती आयोगाने केल्या आहेत. लहान मुलं आणि ज्येष्ठांना लागण झाल्यास काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले. कोरोनाचे रूग्णही काही राज्यात वाढले आहेत, त्यावरही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यावर पुन्हा एका कोरोनाचे संकट घोंघावत आहे. H3N2 सोबतच कोरोनाने आता राज्याचं टेंशन वाढवले. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या राज्यात H3N2 चे 352 रुग्ण आहेत. H3N2 नं राज्यातला पहिला बळी घेतलाय. अहमदनगरमध्ये एका तरुणाचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर नागपूरमध्ये H3N2 मुळे एका 78 वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगर आणि इतर शहरांमध्ये H3N2 व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतेय. सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणं दिसली तरी डॉक्टरांकडे जा. कोरोनासंबंधी कुठलंही लक्षण असेल तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या असा सूचना करण्यात येत आहेत.
विशेषतः गर्भवती महिला, 5 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं आणि वयोवृद्ध नागरिकांमध्ये हा फ्लू झपाट्यानं पसरत आहे. एवढंच नव्हे तर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांमध्येही एन्फ्लूएन्झा संक्रमित होण्याचा धोका जास्त आहे. खोकला, नाक वाहणे किंवा बंद होणे. गळ्यात खवखव, तापडोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे आणि थकवा अशी या व्हायरलसची लक्षणे आहेत.