Air India News : मुंबईच्या मालाडमध्ये एका डॉक्टरने ऑनलाईन मागवलेल्या आइस्क्रिममध्ये चक्क मानवी बोट आढळलं होतं. त्यानंतर नोएडामध्ये ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आइस्क्रिमच्या फॅमिली पॅकमध्ये चक्क किडा आढळला. महिलेलने आइस्क्रिमच्या डब्याचं झाकण उघडताच तिला त्यात एक किडा चालताना दिसला होता. या घटना ताज्या असतानाच आता एअरइंडिया विमानात (Air India Flight) एका प्रवाशाच्या जेवणात धोकादायक वस्तू आढळली. या प्रवाशाने सोशल मीडियावर याचे फोटो शेअर केले आहेत. यावर एअर इंडियाने स्पष्टीकरणही दिलं आहे.
काय आहे नेमकी घटना?
एअर इंडियाचं एक विमान बंगळुरुहून सॅन फ्रान्सिस्कोला (Bengaluru to san fransisco) जात होतं. या विमानातून प्रवास करणाऱ्या मॅथ्यूज पॉल नावाच्या प्रवाशाने जेवण ऑर्डर केलं. जेवणाचा घास घेतल्यानंतर मॅथ्यूजला तोंडात धातूसारखी वस्तू जाणवली. मॅथ्यूजने घास काढून पाहिल्यावर त्यात चक्क ब्लेड (Blade) निघाला.
मॅथ्यू पॉलने सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला आहे. यात त्याने म्हटलंय 'एअर इंडियाचं जेवण तुम्हाला चाकू सारखं कापू शकतं. भाजलेली रताळी आणि अंजीर चाट हे धातूच्या ब्लेडसारखी आहेत, याची जाणीव मला तेव्हा झाली ज्यावेळी मी हे खात होतो. सुदैवाने मला कोणताही इजा झाली नाही'
यापुढे मॅथ्यूजने म्हटलंय 'यासाठी एअर इंडियाची कॅटरिंग सेवा पूर्णपण दोषी आहे. हेच जेवण एखाद्या लहान मुलाला दिलं असतं तर किती परिणाम भोगावे लागले असतं, असंही मॅथ्यूज पॉलने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
Air India food can cut like a knife. Hiding in its roasted sweet potato and fig chaat was a metal piece that looked like a blade. I got a feel of it only after chewing the grub for a few seconds. Thankfully, no harm was done. Of course, the blame squarely lies with Air India’s… pic.twitter.com/NNBN3ux28S
— Mathures Paul (@MathuresP) June 10, 2024
एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
मॅथ्यूज पॉलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर एअर इंडियाने त्याला बिझनेस क्लास तिकिटाची ऑफर केली. हे तिकिटाद्वारे एअर इंडियाच्या कोणत्याही विमानात प्रवास करु शकता. एका वर्षापर्यंत हे तिकिट वैध असतं. पण मॅथ्यूज पॉल या प्रवाशाने एअर इंडियाची ही ऑफर धुडकावून लावली आहे.
एअर इंडियाने केलेल्या दाव्यानुसार हे ब्लेड भाजी कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनचा तुकडा आहे. एअर इंडियाचे चीफ कस्टमर एक्सपीरियंस ऑफिसर राजेश डोगर यांनी आपल्या एका प्रवाशाच्या जेवणात एक वस्तू आढळल्याची कबुली दिली आहे. पण ही वस्तू जेवणासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनचा तुकडा असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.