नवी दिल्ली : शहीद कमांडो ज्योती प्रकाश निराला हे ते वीर कमांडो होते. ज्यांनी काश्मीरच्या बांदीपोरामध्ये देशाच्या रक्षणासाठी दहशतवाद्यासोबत लढताना प्राण दिले. भारत मातेच्या या वीर जवानाने २ दहशतवाद्यांचा खात्मा केला. वीर गरुड कमांडो ज्योती प्रकाश निराला यांची बहिण शशिकला नुकतीच विवाह बंधनात अडकली. लग्नात भाऊ नव्हता. पण शहीद भावाच्या जागी १०० भाऊ उपस्थित होते. आपल्या या बहिणीला या १०० भावांनी डोलीमध्ये बसवलं. गरुड कमांडो टीम शहीद ज्योती प्रकाश निराला यांच्या बहिणीच्या लग्नाला आवर्जुन उपस्थित होते. त्यांनी भावाची अनुपस्थिती या भावांनी जाणवू नाही दिली.
बहिणीच्या लग्नासाठी पोहोचलेल्या या १०० भावांनी असं काही केलं की, गावातील आणि उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. एकीकडे १०० भावांची उपस्थिती आणि दुसरीकडे शहीद झालेल्या भावाचं दु:ख होतं. १०० गरुड कमांडो जवानांनी आपले हात जमिनीवर ठेवून त्यावरुन बहिणीला सासरी पाठवलं. यावेळी शहीद ज्योती प्रकाश निरालाच्या वडिलांनी जवानांचे आभार मानले.
शहीद ज्योती प्रकाश निराला यांची बहिण शशिकला यांचा विवाह बिहारच्या पाली रोड डेहरी येथे राहणाऱ्या सुजीत कुमारसोबत झाला. महत्त्वाचं म्हणजे, घरात एकमेव कमवता व्यक्ती असलेले शहीद ज्योती प्रकाश निराला यांच्या बहिणीच्या लग्नासाठी १०० जवानांनी ५ लाख रुपये जमा केले. कारण बहिणीच्या लग्नात काहीच कमी पडू नये.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्या विरोधातील कारवाईत ज्योती प्रकाश निराला हे स्पेशल ड्यूटीवर हाजिन येथे तैनात होते. २०१७ मध्ये बांदीपोरामध्ये कारवाई दरम्यान ते शहीद झाले. त्यांनी २ दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि २ दहशतवाद्यांचा गंभीर जखमी केलं.
गरुड कमांडो निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं. निराला यांच्या पत्नीने राष्ट्रपतींकडून हा सन्मान घेतला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देखील भावुक झाले होते.