Bangladeshi Might Enter India: बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती दिवसोंदिवस चिघळत असून भारतामध्येही या गोंधळामुळे टेन्शन वाढल्याचं चित्र दिसत आहे. सोमवारी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन भारतात आश्रय घेतल्यानंतर बांगलादेशमध्ये सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र असं असतानाच दुसरीकडे महिन्याभराहून अधिक काळापासून सुरु असलेल्या हिंसाचारामुळे बांगलादेशमध्ये फारच स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेशमधील हिंसाचारामुळे पुढील काही दिवसांमध्ये या देशातून भारतामध्ये तब्बल 1 कोटी हिंदू दाखल होती अशी शक्यता पश्चिम बांगालमधील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्याने व्यक्त केली आहे.
पश्चिम बांगालमधील विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी पाश्चिम बांगालमध्ये पुढील काही दिवसांत एक कोटी स्थलांतरित हिंदू बांगलादेशमधून दाखल होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना सुवेंदू अधिकारी यांनी, पश्चिम बांगलामधील जनतेनं एक कोटी हिंदू स्थलांतरितांसाठी तयार रहावं असं म्हटलं आहे. "बांगलादेशमध्ये हिंदूंची हत्या केली जात आहे. रंगपूर नगरपरिषदेमधील नगरसेवक हरधन नायक यांची हत्या करण्यात आली आहे. सिराजगंजमध्ये 13 पोलिसांची हत्या करण्यात आली आहे. या 13 पैकी 9 पोलीस हिंदू होते," असं सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं आहे.
नोआखाली येथील हिंदूंची घरं जाळण्यात आल्याचा दावाही भाजपाच्या या नेत्याने केला आहे. "मला राज्यपालांना (सी. व्ही. आनंद बोस यांना) तसेच मुख्यमंत्र्यांना (ममता बॅनर्जी यांना) विनंती करायची आहे की त्यांनी केंद्र सरकारशी संवाद साधावा. नव्या सुधारित नागरिकत्व कायद्यामध्ये (CAA) स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की एखाद्या धार्मिक (बांगलादेशमध्ये सुरु आहे तशा) हिंसाचाराला बळी पडलेल्या व्यक्तीला आपण आश्रय देणे गरजेचे आहे," असंही सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं आहे.
तसेच पुढील काही दिवसांमध्ये बांगलादेशमधील परिस्थिती नियंत्रणात आली नाही आणि बदलली नाही तर भारताचा हा शेजारी देश कट्टरतावाद्यांच्या हाती जाईल अशी भीतीही सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केली. "एक कोटी स्थलांतरिक हिंदूंना आश्रय देण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार राहिलं पाहिजे. किमान मी तरी त्यासाठी तयार आहे," असं सुवेंदू अधिकारी म्हणाले. तसेच सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बांगलामधील हिंदू जनतेला बांगलादेशमधून येणाऱ्या हिंदू स्थलांतरितांना आश्रय देण्याचं आवाहनही केलं. 1971 ला ज्याप्रमाणे आपण हिंदू बांधवांना आश्रय दिला तसाच आताही द्यावा, असं सुवेंदू अधिकारी म्हणाले.