World Kindness Day: जागतिक दयाळू दिनाचं महत्त्व माहितीये?

अनेक आजारांपासून दूर ठेवतो दयाळू स्वभाव...

Updated: Nov 13, 2019, 02:24 PM IST
World Kindness Day: जागतिक दयाळू दिनाचं महत्त्व माहितीये?  title=
संग्रहित फोटो

मुंबई : दयाळूपणा किंवा kindness आरोग्यसंपन्न आयुष्य जगण्यासाठी मदत करतो. दयाळूपणा आनंदी राहण्याव्यतिरिक्त मन शांत ठेवण्यातही मदत करतो. त्यामुळे एखाद्याची मदत करणं, दान करणं, लोकांची सेवा करणं या सर्व गोष्टी या भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. १३ नोव्हेंबर रोजी जगभरात  World Kindness Day साजरा केला जातो.

मनात कोणताही द्वेष न ठेवता, दयापूर्ण भावनेने इतरांना मदत करणं, हा आरोग्यदायी आयुष्य जगण्याचा एक मार्ग आहे. सोशल एन्क्झायटी अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत असते. मानसिक आरोग्याचा थेट संबंध हा शारीरिक आरोग्याशी येत असतो. अशा प्रकारची सोशल एन्क्झायटीची समस्या आपल्या आयुष्य जगण्याच्या गुणवत्तेवर परिणाम करते.

दयाळू भाव ठेवणाऱ्यांचा सोशल एन्क्झायटीपासून सहजपणे बचाव होत असल्याचं, अनेक अभ्यासातून आणि संशोधनातून सांगण्यात आलं आहे. या भावनेमुळे मन शांत राहतं. बैचेन, अस्वस्थता कमी होत असल्याने तणाव, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्यांपासूनही व्यक्ती लांब राहू शकतात.

शरीरावर येणारी सूजही अनेक आजारांशी संबंधीत असते. मधुमेह, कर्करोग, क्रोनिक पेन (तीव्र वेदना), लठ्ठपणा, मायग्रेन या आजारांचं एक कारण ही सूजदेखील आहे. ऑक्सिटॉसिन हार्मोन्स ही सूज कमी करतात. दयाळूपणा किंवा दया भाव शरीरात हे अतिमहत्त्वाचे ऑक्सिटॉसिन हार्मोन्स निर्माण करतात.

  

ज्या व्यक्ती जीवनात इतरांप्रती दयाभाव ठेवतात, स्वार्थाशिवाय दुसऱ्यांना मदत करतात ते संतुष्ट आणि अधिक आनंदी राहतात. २००६ मध्ये 'जर्नल ऑफ हॅप्पीनेस'मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासात ही गोष्ट समोर आली आहे. दया आणि सामाजिक सेवांवर आधारित कार्यक्रमात भाग घेणाऱ्या व्यक्ती आपल्या आयुष्याप्रती अधिक आनंदी असल्याची बाब एका अभ्यासातून समोर आली आहे.

मग...? तुम्ही आहात ना 'आनंदी'?