ट्रेक करताना श्वास घ्यायला का त्रास होतो? जाणून घ्या कारण आणि उपाय

ट्रेकिंग करताना अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतो. परंतु, हे असं का होतं आणि यावरील उपाय काय? जाणून घ्या सविस्तर.

Updated: Jan 26, 2025, 03:14 PM IST
ट्रेक करताना श्वास घ्यायला का त्रास होतो? जाणून घ्या कारण आणि उपाय title=

Shortness od breath while trekking: बरेचजण हिवाळ्यात ट्रेकिंगला जाणं पसंद करतात. असा छंद जोपासणाऱ्यांसाठी ट्रेकिंग करणं हे खूप उत्साहवर्धक आणि रोमांचक अनुभव असतो. परंतु, कधीकधी ट्रेकिंग करताना लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो. ट्रेकिंग करताना श्वसनासंबंधी समस्या का उद्भवतात? आणि यावरील नेमका उपाय काय? चला, जाणून घेऊया.

श्वास घेण्यास त्रास का होतो?

ट्रेकिंग करताना श्वास घेण्यात अडथळे येण्यामागचं एक वैज्ञानिक कारण आहे. खरंतर, आपण जेव्हा उंचीवर जातो किंवा चढतो, तेव्हा हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कालांतराने घटते. समुद्रसपाटीपासून 2500 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त उंचीवर अ‍ॅट्मॉस्फेरिक प्रेशर कमी होतं आणि यामुळेच शरीराला आवश्यक तितकं ऑक्सीजन मिळू शकत नाही. शरीरातील या ऑक्सीजनच्या कमतरतेला 'हाय अल्टीट्यूड सिकनेस' असं म्हटलं जातं. श्वास घेण्यात अडचणी, थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी आणि मळमळ होणे ही हाय अल्टीट्यूड सिकनेसची लक्षणे आहेत. 

शरीरावर कसा होतो परिणाम?

1. ऑक्सिजन पातळी खालावते
जास्त अल्टीट्यूड म्हणजेच अधिक उंचीवर गेल्यास ऑक्सिजनची कमतरता भासते आणि यामुळे फुफ्फुसांपर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.

2. अनुकूलतेचा अभाव
शरीराला वेगळ्या उंचीवर नव्या वातावरणाची सवय होण्यासाठी वेळ लागतो. अचानक उंचीवर गेल्याने शरीराला त्या वातावरणाची पटकन सवय होत नसल्यामुळे त्याठिकाणी अनुकूलतेचा अभाव जाणवू लागतो. 

3. शारीरिक स्वास्थ्य
ज्या लोकांचे शारीरिक स्वास्थ्य आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, त्यांना अशा समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. 

श्वसनासंबंधी समस्यांवरील उपाय

1. हळूहळू चढा
ट्रेकिंग करताना नेहमी सावकाश चढायला हवे तसेच चढण्याचा वेग कमी असावा. हळूहळू चढल्याने शरीराला त्या वातावरणात अनुकूल होण्यासाठी मदत होते. 

2. हायड्रेटेड रहा
शरीरासाठी पुरेशा प्रमाणात पाणी अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे वारंवार योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने या समस्या दूर राहण्यास मदत होते. 

3. ब्रेक घ्या
ट्रेकिंग करताना मध्ये काही काळ थांबा आणि विश्रांती घ्या.

4. अनुकूलतेसाठी वेळ द्या
ट्रेकिंगला सुरुवात करण्यापूर्वी त्या भागात काही दिवस घालवा जेणेकरून शरीराला उंचीवरील वातावरणाशी अनुकूल होता येईल.

5. योग्य प्रमाणात आहार घ्या
सात्विक आणि पुरेशा प्रमाणात आहार घ्या जेणेकरुन ट्रेकिंगसाठी शरीराला ऊर्जा मिळेल.

हे ही वाचा: गाजर हलवा खाताना तुम्ही देखील करताय 'ही' चूक? आरोग्यावर होतो थेट परिणाम

 

श्वास घेण्यास त्रास झाल्यावर काय करावे?

तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तसेच त्यासंबंधीची लक्षणे जाणवल्यास थोडा वेळ थांबा आणि दीर्घ श्वास घ्या. ऑक्सिजनची कमतरता टाळण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर सोबत ठेवा.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)