मुंबई : माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या भक्कम नेत्या सुषमा स्वराज यांचे मंगळवारी निधन झाले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्डियक अरेस्टमुळे त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं. गेल्या काही वर्षांपासून देशात कार्डियक अरेस्टचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. नेमका काय असतो कार्डियक अरेस्ट? जाणून घ्या काय आहेत याची लक्षणं -
ज्यावेळी हृदय शरीराला रक्ताचा पुरवठा करणं बंद करतं त्यावेळी कार्डियक अरेस्ट होण्याची शक्यता असते. याला सडन कार्डियक अरेस्ट म्हणजेच SCA देखील बोललं जात. ही एक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आहे.
वैद्यकीय भाषेत, कार्डियक अरेस्टचं कारण सामान्यत: हृदयाची असामान्य लय असं म्हटलं जातं.
कोरोनेरी आर्टरी डिसीज (हृद्य रक्तवाहिन्यांचा विकार), हृदयरोग, शारीरिक ताण, मोठ्या प्रमाणात रक्ताची कमी, ऑक्सिजनची कमी, अधिक व्यायाम अशी कार्डियक अरेस्टची प्रमुख कारणं मानली जातात. अनेकदा सडन कार्डियक अरेस्टच्या कारणांचा शोध लावणंही कठिण असतं.
डॉक्टरांच्या मते, सडन कार्डियक अरेस्टची कारणं धुम्रपान, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, अधिक कोलेस्ट्रॉल, मधुमेह, मद्यपान तसंच बदलती जीवनशैली असल्याचं मानलं जातं.
हृदयविकाराच्या अनेक प्रकरणांत, काही दिवस आधी श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता असते. ही लक्षणं पुरुष आणि महिलांमध्ये समान प्रमाणात आढळतात.
काही लोकांना उलटी होणं, अस्वस्थ वाटणं अशा समस्या उद्भवतात. महिलांमध्ये ही लक्षणं अधिक दिसून येतात. याशिवाय घाम येणं, चक्कर येणं या समस्यांकडेही दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला जातो.
'हेल्थ डॉट कॉम'नुसार, अचानक बेशुद्ध होणं, तीव्रतेने चक्कर येणं अनेकदा ही लक्षण हृदयाशी संबंधित असण्याची शक्यता असते.
अनेक संशोधनांमधून सांगण्यात आले आहे की, ज्यावेळी हृदय योग्यप्रकारे ब्लड पंप करत नाही, त्यावेळी पायांना किंवा पायांच्या तळव्यांना सूज येण्याची शक्यता असते. अशा समस्या वारंवार होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नये. यावर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं मह्त्त्वाचं आहे.