मुंबई : विविध रंगाची उधळण कऱणारा सण म्हणजे रंगपंचमी. रंगपचमीचा सण एका दिवसावर येऊन ठेपलाय. या सणासाठी तुम्ही भरपूर तयारीही केली असेल.
रंगपंचमीच्या दिवशी अनेकजण केस, त्वचेची काळजी न घेता हा सण खेळता. रंग खेळण्याआधी त्वचा अथवा केसांची काळजी न घेतल्यास त्याचे परिणाम नंतर भोगावे लागतात.
रंग खेळण्याआधी केसांची योग्य काळजी घेणे गरजेचे असते नाहीतर केसांचा पोत बिघडतो. रंग खेळताना केसांची अशी घ्या काळजी...
रंग खेळताना केस मोकळे सोडू नका. केस मोकळे सोडल्यास रंग केसांच्या मुळांपर्यंत जातो. ज्यामुळे केसांचे अधिक नुकसान होते.
होळी खेळण्याआधी 15 मिनिटे केसांना तेलाने मालिश करा. नारळ, ऑलिव्ह ऑईल, राईचे तेल अथवा इतर कोणत्याही तेलाने मालिश करा. तेल लावल्याने रंग केसांना इजा पोहोचवणार नाही.
सुके रंग खेळल्यास केसांमधून कंगव्याने रंग हटवा. त्यानंतर पाण्याने केस धुवा. जर तुम्ही ओले रंग वापरले असतील तर साध्या पाण्याने केस धुवून घ्या त्यानंतर शॅम्पूने केस धुवा.
रंग खेळल्यानंतर कधीही गरम पाण्याने केस धुवू नका. गरम पाण्याने केस धुतल्यास तुमच्या केसांना नुकसान पोहोचते. ते कमकुवत होतात.