Nose Picking : शीssss नाकातून बोट बाहेर काढ...नाकात नको बोट घालू...आपण अनेकदा नाकात बोटं घालताना कोणाला पाहिलं की आपल्या तोंडून हेच शब्द बाहेर पडतात. काही लोकं तर एकांतात असताना असं कृत्य करतात. आपल्यापैकी अनेकांना असं कृत्य पाहून किळस वाटते. मात्र तुम्हाला माहितीये का, अनेकांची असलेली ही सवय त्यांना गंभीर आजारी पाडू शकते. नाकात बोट घालण्याच्या सवयीने अल्झायमर तसंच डिमेंशिया होण्याचा धोका असतो.
ऑस्ट्रेलियामधील एका युनिवर्सिटीच्या शास्त्रज्ज्ञांनी उंदरांवर संशोधन केलं आहे. या अभ्यासात संशोधकांना असं आढळून आलं की, बोटांद्वारे क्लॅमायडिया न्यूमोनिए नावाचा बॅक्टेरिया थेट मेंदूपर्यंत पोहोचू शकतो.
या अभ्यासानुसार, हा बॅक्टेरिया मेंदूपर्यंत पोहोचल्यावर असे बदल करतो, जे अल्झायमर आजाराने संकेत होते. या संशोधनाच्या प्रमुख तज्ज्ञांनी सांगितलं की, आम्ही ही चाचणी उंदरांवर केलीये. परंतु माणसांमध्ये त्याचे परिणाम आणखी भयावह असण्याची शक्यता आहे.
या तज्ज्ञांनी पुढे सांगितलं की, नाकात बोट घालणं तसंच केस तोडणं ही वाईट परिस्थिती आहे. नाकात बोट घातल्याने नाकातील अस्तर खराब होण्याची शक्यता असते. यामुळे मेंदूमध्ये बॅक्टेरिया जाण्याचा धोका वाढतो. यामुळे वास घेण्याची शक्ती कमी होण्याची शक्यता असते. मुख्य म्हणजे, अल्झायमरचं प्राथर्मिक लक्षण म्हणजं वास नसणं हे आहे.