coronavirus : रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या या घरगुती टिप्स पाहाच...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या नियमांचं पालन करण्याचं सांगितलं आहे.

Updated: Apr 14, 2020, 04:02 PM IST
coronavirus : रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या या घरगुती टिप्स पाहाच... title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढतोच आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती अधिक चांगली असणं महत्त्वाचं ठरतंय. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही घरगुती आणि सोप्या टिप्स दिल्या आहेत. 

 

आयुष मंत्रालयाने सेल्फ केअर गाईडलाईन्स अर्थात स्वत:ची काळजी घेण्याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. लोक श्वासासंबंधी रोगांपासून, आजारांपासून स्वत:चा बचाव करु शकण्यासाठी आयुष मंत्रालयाने काही गाईडलाईन्स सांगितल्या आहेत.

लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरसमज पसरु नये यासाठी आयुष मंत्रालयाने काही आयुर्वेदिक टिप्स सांगितल्या आहेत. 

- संपूर्ण दिवसभरात ज्या-ज्या वेळी पाणी प्याल त्यावेळी कोमट पाणी प्यावे
- दररोज दिवसांतून कमीत कमी 30 मिनिटं तरी योगासनं, प्राणायम, ध्यान-धारणा आवश्यक करावी.
- हळद, जीरं, धणे, लसून या पदार्थांचा जेवणात समावेश जरुर करा.
- दररोज एक चमचा च्यवनप्राश खाऊन दिवसाची सुरुवात करा.
- ज्या लोकांना मधुमेधाची समस्या आहे, त्या लोकांनी शुगर फ्री च्यवनप्राश खावं
- हर्बल टी किंवा काढा प्यावा.
- काढा बनवण्यासाठी तुळस, दालचिनी, काळी मिरी, आलं, मनुका पाण्यात एकत्र उकळवून, त्यानंतर ते गाळून हा काढा प्यावा.
- हळद घातलेलं दूध पिणे.
- तिळ किंवा नारळाचं तेल किंवा देशी तूपाचे दोन थेंब नाकपुड्यांमध्ये टाकावे.

देशातील आयुर्वेदाचार्यांकडून ही माहिती देण्यात आली आहे. प्रत्येकाने आपली गरज आणि सोयीप्रमाणे याचा उपयोग करावा. बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या समस्यांशी लढण्यासाठी हे उपाय फायदेशीर ठरु शकतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या नियमांचं पालन करण्याचं सांगितलं आहे. तसेच, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करुन त्यांच्या सूचनांचं पालन करण्याचंही त्यांनी सांगितलं आहे.