पूर्ण लसीकरण होऊनही डेल्टाचा संसर्ग; ICMRचं नवं संशोधन

पूर्ण लसीकरण होऊनही डेल्टाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे असं आयसीएमआरने स्पष्ट केलंय.

Updated: Aug 19, 2021, 09:37 AM IST
पूर्ण लसीकरण होऊनही डेल्टाचा संसर्ग; ICMRचं नवं संशोधन title=

मुंबई : लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि आता तुम्ही बेफिकीर राहू शकता असा विचार करत असाल तर सावधान... कारण याबाबत आयसीएमआरने स्पष्टीकरण दिलं आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर देखील काळजी घेणं गरजेचं असतं असं आयसीएमआरकडून सांगण्यात आलं आहे.

पूर्ण लसीकरण होऊनही डेल्टाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे असं आयसीएमआरने स्पष्ट केलंय. लसीकरणानंतर संसर्ग झाला तरी मृत्यूचा धोका कमी असल्याचं आयसीएमआरने म्हटलंय. आयसीएमआरने चेन्नईत केलेल्या अभ्यासातून हे उघड झालंय. त्यामुळे दोन्ही डोस झाले तरी बेफिकीर न राहता काळजी घेणं अनिवार्य असल्याचं, आयसीएमआरने म्हटलंय.

एम्स झज्जरमध्ये दाखल रुग्णांच्या अहवालात 294 (76%) लसीकरण न झालेल्या लोकांचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलंय. तर दुसरीकडे दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये फक्त 1 जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच केवळ 0.03% मरण पावले. यानुसार असं लक्षात येतंय की, लसीकरण हे या विषाणूविरूद्ध सर्वात प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घ्यावी.

दुसरीकडे देशभरात लसीकरण मोहीमेला वेग देण्यात येतोय. मात्र मुंबईत आज आणि उद्या लसीकरण बंद असणार आहे. महापालिकेकडील लशींचा साठा संपल्यामुळे लसीकरण बंद ठेवण्यात आलंय. त्यामुळे आता नागरिकांना लसीकरणासाठी थेट शनिवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

गेल्याच आठवड्यात लसींचा साठा संपल्यामुळे महापालिकेला दोन दिवस लसीकरण बंद ठेवावं लागलं होतं. आज पुन्हा तीच वेळ महापालिकेवर आली. आज रात्रीपर्यंत लशींचा साठा येणार असल्याची माहिती आहे. जर आज हा साठा आला तर शुक्रवारी दिवसभरात केंद्रांवर वितरित करण्यात येईल. त्यामुळे लसीकरण शनिवारी सुरू होण्याची शक्यता आहे.