Actress Answer on Chhatrapati Shivaji Maharaj Height : गेल्या काही दिवसांपासून मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा रंगत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर तिथे पाहणीकरण्यासाठी आदित्य ठाकरे आणि नारायण राणे हे नुकतेच तिथे पोहोचले आहेत. या सगळ्यात आता पुन्हा एकदा एका जुन्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. खरंतर हा व्हिडीओ झी मराठी वाहिनीवरील एका मालिकेतील आहे.
अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत अप्पी तिचं कलेक्टर होण्याचं स्वप्न पूरअम करण्याच्या काही पाऊल दूर असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी युपीएससीची परीक्षा पास झाली असून आता तिची मुलाखत होणार असते. या मुलाखतीत आप्पीला छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधीत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी आप्पीला 'छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होती?' असा प्रश्न मुलाखतीत विचारण्यात आला. या प्रश्नाला तिनं दिलेलं उत्तर ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य झालं.
अप्पीनं मुलाखतीत उत्तर देत म्हटलं की 'मॅडम वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळे संदर्भ आहेत. अनेक इतिहासकारांनी वेगवेगळे अंदाज लावले आहेत. अंदाजे त्यांची उंची पाच फुट पाच इंचं ते पाच फुट आठ इंचं एवढी असेल.' तर अप्पीचं उत्तर ऐकूण संतुष्ट नसलेल्या मुलाखत घेणाऱ्या महिलेनं म्हटलं की 'मला ठाम उत्तर हवं आहे.' अशात अप्पी उत्तर देत म्हणते की 'मॅडम 4406 फूट उंच असलेला तोरणा किल्ला महाराजांनी काबीज केला. 350 वर्षांची गुलामी तोडून स्वराज्याचं तोरण बांधलं. आता या माणसाची उंची आपण कशी मोजायची नाही का…' अप्पीनं दिलेलं हे उत्तर ऐकताच तिथे मुलाखत घेत असलेले सगळे आनंदी होतात.
दरम्यान, मालवणमधील शिवरायांचा पुतळ्याचं बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागानं केलेल्या तक्रारीतून हे उघड झालं आहे. शिल्पकारानं या पुतळ्याच्या सुस्थिती आणि सुरक्षिततेचा विचार न केल्याचा आरोप केला आहे. शासनाची फसवणूक आणि त्यासोबत सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केल्याचंही या तक्रारीत नमूद करण्यात आलंय. या प्रकरणी आर्टिस्टरी कंपनीचे मालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.