मुंबई : काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने एका चित्रपटाच्या सेटवर तिच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा खुलासा केला होता. बऱ्याच वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा उलगडा तिने केला होता. ज्यानंतर संपूर्ण कलाविश्वात बऱ्याच अभिनेत्रींनी त्यांच्यासोबतचे कास्टिंग काऊचचे अनुभव सांगितले. यातच आता आणखी एका टेलिव्हिजन अभिनेत्रीचं नावही चर्चेत आलं आहे. या अभिनेत्रीनेकडे अशी काही मागणी करण्यात आली होती ज्यामुळे अखेर तिने अभिनय क्षेत्रातूनच काढता पाय घेतला. ती अभिनेत्री म्हणजे रिचा भद्रा. 'खिचडी' या मालिकेत बालकलाकाराची भूमिका साकारत ती प्रसिद्धीझोतात आली होती. 'बा बहू और बेबी', 'मिसेस तेंडुलकर' आणि 'गुमराह'तूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
'चक्की पारेख' साकारणाऱ्या रिचाने एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला. 'मला खुश ठेव; काम मिळेल', 'मी काहीसे मजेशीर भूमिका करण्यावर भर दिला होता. कारण, रोमँटिक किंवा एक्सपोस दृश्य करण्यास माझ्या कुटुंबाकडून परवानगी नव्हती. त्यातही मी काही सडपातळ नव्हते आणि कुटुंबाच्या विरोधात जाऊ इच्छित नव्हते' असं रिचा म्हणाली.
आपण कधीही कास्टिंग काऊचचा सामना केला नव्हता हे रिचाने स्पष्ट केलं. पण, लग्नानंतर जेव्हा ऑडिशनसाठी म्हणून ती गेली तेव्हा एका कास्टिंग डायरेक्टरचं वागणं पाहून तिला धक्काच मिळाला. 'मला खुश कर... तर तुला काम मिळेल', असं तो तिला म्हणाल्याचं रिचाने मुलाखतीत सांगितलं. आपण त्याच्यासोबत हॉटेलमध्ये जावं अशी त्याती इच्छा होती. या साऱ्या घटनांनीच मी तुटले आणि अखेर या क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला, असा गौप्यस्फोट तिने केला. कास्टिंग काऊचचा सामना करणारी रिचा सध्या या क्षेत्रापासून बरीच दूर असून कॉर्पोरेट विश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करु पाहात आहे. रिचासारख्या अनेक अभिनेत्री या क्षेत्रात नाव कमवण्याच्या उद्देशाने अनेक आकांक्षा बाळगून येतात. पण, काही वाईट प्रवृत्तींच्या व्यक्तींमुळे या क्षेत्रात त्याची सुरुवातच वाईट अनुभवांतून होते, परिणामी या क्षेत्राकडेच अनेकजण पाठ फिरवतात.