मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोनम कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजा यांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. अखेर, मुंबईमध्ये होणाऱ्या या लग्नाची तारीख समोर आलीय. सोनमच्या संगीत सेरेमनीसाठी तिचे वडील अर्थात अनिल कपूर तिला एक खास गिफ्टही देणार आहेत.
सोनम आणि आनंदच्या घरी लग्नाच्या तयारीलाही सुरुवात झालीय. आनंद दिल्लीच्या एका व्यावसायिक कुटुंबातून आहे. स्टारडस्टच्या माहितीनुसार, सोनम - आनंदच्या लग्नासाठी ६ आणि ७ मे ही तारीख निश्चित करण्यात आलीय.
मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्नाचे विधी पार पडतील, असं समजतंय. त्यानंतर दिल्लीतही ग्रँड रिसेप्शन दिलं जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक सेलिब्रिटिंना या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकाही धाडून झाल्यात.
विशेष म्हणजे, अगोदर सोनम-आनंद यांचं लग्न जिनिवामध्ये होणार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु, योग्य ठिकाण न मिळाल्यानं हे लग्न आता मुंबईतच होणार आहे.
कपूर कुटुंबीय तर सोनमच्या संगीत सेरेमनीसाठी सज्ज झालेत. इतकंच नाही तर त्यांनी या सोहळ्यासाठी फराह खान हिला कोरिओग्राफीसाठी आमंत्रित केलंय. या सोहळ्यात वधूपिता अनिल कपूर पत्नी सुनीता हिच्यासोबत स्पेशल परफॉर्मन्स सादर करणार आहेत... आणि निश्चितच हिच सोनमसाठी अतिशय अमूल्य अशी भेट असेल.