बदलापूरमधील परफॉर्मन्स, 'ती' एक भेट अन् थेट ऑडिशनसाठी फोन....; अशी मिळाली Shivali Parab ला हास्यजत्रेची संधी

Shivali Parab Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी मालिकेतील शिवाली परब ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिवालीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला हास्यजत्रेत काम करण्याची संधी कशी आणि कोणाच्या रेफरन्सनं मिळाली ते सांगितलं आहे.

दिक्षा पाटील | Updated: May 14, 2023, 05:36 PM IST
बदलापूरमधील परफॉर्मन्स, 'ती' एक भेट अन् थेट ऑडिशनसाठी फोन....; अशी मिळाली Shivali Parab ला हास्यजत्रेची संधी title=
(Photo Credit : Shivali Parab Instagram)

Shivali Parab Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही कॉमेडी मालिका चांगलीच गाजली आहे. या मालिकेनं कोरोना काळात प्रेक्षकांना खूप हसवलं. आजही त्यांचे प्रेक्षक काही कमी झालेले नाहीत. या कार्यक्रमात असणाऱ्या कलाकारांचे नेहमीच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. या कार्यक्रमातील अभिनेत्री शिवालीनं नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, आता शिवालीनं तिला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी मालिकेत संधी कशी मिळाली याविषयी सांगितलं आहे. 

शिवालीनं सकाळ पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी हास्यजत्रेत मिळालेल्या संधी विषयी बोलताना नम्रता संभेरावमुळे संधी मिळाल्याचे सांगत शिवाली म्हणाली, 'माझ्या घरात सिनेसृष्टीशी संबंधित कोणीही नव्हतं. मी सुरुवातीला एकांकिका, नाटक या क्षेत्रात काम करायचे. त्यानंतर मग मी जोगेश्वरीमधील एक ग्रुप जॉईन केला. त्यांनी बदलापूरला ‘आगरी महोत्सव’ म्हणून एक कार्यक्रम घेतला होता. त्यात मी असिस्टंट म्हणून काम करत होते. यावेळी नम्रता ताई आणि अरुण काका हे दोघेही त्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते. तिथे आगरी महोत्सव असल्याने आगरी भाषेत बोलायचं होतं. पण तिथे मुलांना ती भाषा येत नव्हती. मला ती भाषा येत होती. तेव्हा नम्रता ताईने आपण हिलाही यात घेऊ या, हिला आगरी बोलता येतंय, असं सांगितलं.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे त्या कार्यक्रमानंतर कशी संधी आली हे सांगत शिवाली म्हणाली, मी त्या कार्यक्रमात सहभागी झाले आणि हा संपूर्ण कार्यक्रम केला. नम्रता ताईला माझं काम आवडलं आणि परफॉर्मन्स झाल्यानंतर नम्रता ताई आणि तिचे पती योगेश दादा यांनी मला त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावले आणि माझे कौतुक केले. तर माझ्याकडून तुला नक्कीच एक काम देईन असे नम्रता ताईनं मला सांगितले. 

अचानक एक दिवस ऑडिशनसाठी शिवालीला आला कॉल

ऑडिशसाठी आलेल्या कॉल विषयी बोलताना शिवाली म्हणाली, 'त्यानंतर एक दिवस मला फोन आला. तो फोन हास्यजत्रेच्या ऑडिशनसाठी होता. त्यावेळी त्या फोनवर त्यांनी नम्रता संभेरावने तुमचा रेफरन्स दिला आहे, असे सांगितले. तेव्हा मला खूपच भारी वाटलं होतं. अशा प्रकारे मला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही संधी नम्रता ताईमुळे मिळाली. तिच्यामुळे हे शक्य झालं म्हणून मी नेहमीच तिचं नाव सांगत असते आणि तिचे आभार मानते.'

हेही वाचा : तुम्हाला लाजवेल इतक्या सुंदर मराठीत The Kerala Story फेम अदा शर्मानं गायल्या बालपणीच्या कविता! VIDEO एकदा पाहाच

शिवाली ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील तिच्या कोहली या स्किटसाठी खूप ओळली जाते. तिच्या त्या स्किटवर अनेक सेलिब्रिटींनी रिल्स बनवले होते.