नवी दिल्ली: पाकिस्तानी लष्कर आणि राज्यकर्त्यांनी कितीही नाके मुरडली तरी तेथील प्रेक्षक बॉलिवुडच्या सिनेमांना डोक्यावर घेतोच. सध्या देशातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेला सिनेमा 'संजू'चा पाकिस्तानातही चांगलाच बोलबाला आहे. इतका की 'संजू'ची पाकिस्तानातील बॉक्स ऑफिसची कमाई पाहून तेथील दहशतवादीही चांगलेच हबकले आहेत. भारतीय हिंदी चित्रपट आणि कलाकारांची पाकिस्तानमध्ये वाढत असलेली लोकप्रियता तेथील कट्टरपंथीयांना चांगलीच खटकते आहे.
'संजू'ची वाढती लोकप्रियता पाहून तेथील दहशतवादी संघटनांनी सोशल मीडियाच्या माध्यमांतून प्रेक्षकांवर दबाव टाकायला सुरूवात केली आहे. दहशतवाद्यांनी 'संजू'ची भीती इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतली आहे की, त्यांनी संजूचा संबंध थेट काश्मीरशी लावला आहे. दहशतवादी संघटनांनी नागरिकांवर दबाव टाकताना म्हटले आहे की, 'संजू' चित्रपटाला पाकिस्तानात मिळणारा प्रतिसाद हा थेट काश्मीरवर परिणामकारक ठरतो. पाकिस्तानातील संजूची लोकप्रियता काश्मीरमधील त्यांच्या दहशतवाद्याना अस्वस्थ करते.
एका दहशतवादी संघटनेने ट्विट करून मंगळवारी म्हटले की, 'संजू' चित्रपटाने शुक्रवारी ३.२ कोटी रूपये कमाई केली. शनिवारीही या चित्रपटाच्या कमाईचा आकडा वाढून तो थेट ३.५ कोटी रूपयांवर पोहोचली. तर, रविवारीही या चित्रपटाने ३.५८ कोटी रूपयांची कमाई केली. सोमवारी या चित्रपटाचा पाकिस्तानातील कमाईचा आकडा होता २.३ कोटी रूपये. गेल्या चार दिवसात या चित्रपटाने पाकिस्तानात १२.५८ कोटी रूपये कमावले आहेत.