इम्तियाज अलीच्या नव्या चित्रपटात तृप्ती डिमरीसोबत रोमान्स करणार 'पुष्पा 2' चा खलनायक

इम्तियाज अलीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक इम्तियाज अली लवकरच एका नवीन आणि अनोख्या कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार  आहे.

Intern | Updated: Dec 5, 2024, 05:39 PM IST
इम्तियाज अलीच्या नव्या चित्रपटात तृप्ती डिमरीसोबत रोमान्स करणार 'पुष्पा 2' चा खलनायक

Tripti Dimri Fahad Faasil Film: 'या' चित्रपटात दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता फहाद फासिल आणि बॉलिवूडची अभिनेत्री तृप्ती डिमरी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.  

बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी फहाद सज्ज
फहाद फासिल ज्याने 'पुष्पा' या सुपरहिट चित्रपटात 'भंवर सिंग' या पोलिस अधिकाऱ्याच्या अर्थातचं खलनायकाच्या भूमिकेत आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती. तो आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'पुष्पा' आणि 'पुष्पा 2' मधील प्रभावी भूमिकेनंतर फहाद आता इम्तियाज अलीच्या चित्रपटात एका प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरीसोबत मुख्य भूमिकेत असणार आहे.  

तृप्तीने अलीकडेच 'अ‍ॅनिमल' चित्रपटात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तृप्ती आणि फहादची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री कशी जमते, याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट इम्तियाजच्या शैलीला धरून रोमँटिक आणि भावनाप्रधान कथा मांडणारा असणार आहे.  

चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सध्या अंतिम टप्प्याचे काम सुरू आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला या प्रोजेक्टचं शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. इम्तियाज अलीच्या कथाकथन शैलीमुळे आणि फहादच्या अभिनय कौशल्यामुळे हा प्रोजेक्ट आधीच चर्चेत आला आहे.  

अल्लूने केली फहादची स्तुती 
फहाद फासिलने यापूर्वी केलेल्या भूमिकांमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान केले आहे. 'पुष्पा 2' मध्ये त्याने केलेल्या भूमिकेचेही भरभरून कौतुक झाले आहे. अल्लू अर्जुननेदेखील एका कार्यक्रमात फहादच्या अभिनयाची प्रशंसा करत म्हणाला, 'फहाद माझ्या चित्रपटात काम करणाऱ्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे.' 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या पुष्पा 2 मध्येही फहाद महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  

फहाद आणि तृप्तीची जोडी प्रेक्षकांसाठी कशी ठरते आणि इम्तियाजचा हा प्रोजेक्ट बॉक्स ऑफिसवर कसा कामगिरी करतो, हे पाहणं रंजक ठरेल.