Kiran Mane: 'सेक्सची भूक अन् बाईच्या...', अभिनेता किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!

Kiran Mane Share Post: 'सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची' या मालिकेतून किरण माने  (Kiran Mane) पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशातच आता किरण माने यांची सोशल मीडिया पोस्ट सध्या तुफान चर्चेत असल्याचं दिसून येतंय.

Updated: Jul 23, 2023, 03:58 PM IST
Kiran Mane: 'सेक्सची भूक अन् बाईच्या...', अभिनेता किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत! title=
Kiran Mane, Hunger of sex

Kiran Mane On Hunger of Sex: आपल्या बेधडक कामगिरीमुळे नेहमी चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे किरण माने (Kiran Mane). मुलगी झाली हो या मालिकेमुळे किरण माने यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. बिग बॉस मराठीमध्ये किरण माने यांना संधी मिळाली, त्यानंतर त्यांच्या फॅन फॉलोविंगमध्ये चांगलीच वाढ झाल्याचं दिसून आलं. आता 'सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची' या मालिकेतून किरण माने पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशातच आता किरण माने यांची सोशल मीडिया (Kiran Mane Share Post) पोस्ट सध्या तुफान चर्चेत असल्याचं दिसून येतंय.

नेमकं काय म्हणाले किरण माने?

'सेक्सची भूक'... ही गोष्ट लै खत्तरनाक भावांनो! त्या नादात माणूस एकदा का घसरला की भल्याभल्यांचं माकड होतं. एकवेळ 'बाटली'तनं माणूस सहज बाहेर पडेल, पण बाईच्या मोहाच्या 'पिंजर्‍यात' अडकला की त्याच्या 'नशिबानं थट्टा मांडली'च म्हनून समजा.

हे लक्षात घेऊनच आपल्या तुकोबारायावर खार खाऊन असलेल्या विरोधकांनी त्याच्या बदनामीसाठी 'हनी ट्रॅप' लावलावता भावांनो.. पम चारीत्र्यवान तुकोबारायानं त्या बाईला आदरानं दूर करत असा उपदेश केला की ती सुद्धा या विचारांनी भारावून गेली, अंतर्बाह्य बदलून गेली, आपले तुकोबाराया त्या बाईला म्हन्ले

पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि ।।
जांई वो तूं माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास नव्हों तैसे ।।
न साहावें मज तुझें हें पतन । नकों हें वचन दुष्ट वदों ।।
तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे जाले ।।

आम्ही स्वत:ला एक नियमच घालुन ठेवलाय - परस्त्री रखुमाईसमान ! माझे माऊली, तू जा इथून.. आम्हाला आकर्षित करायचं कसलंही प्रयत्न करू नकोस. आम्ही विष्णुदास तसं नसतो. एका स्त्रीचं असं अध:पतन होणं, मला सहन होत नाही, तू ते वावगे शब्द तोंडातून काढूही नकोस.  शेवटी तुका म्हणे, "तुला जर नवराच पायजे - तुला संगच हवाय तर बाहेर नरांची कुठं कमी आहे?"

मंबाजी आणि त्याच्या टोळक्यानं एका वेश्येला पैशांचं आमिष दाखवून तुकोबारायाकडं पाठवलंवतं. तिनं त्यांच्या प्रवचनाला जाऊन, अनुयायी असल्याचं नाटक करून तुकाराम महाराजांना नादी लावायचं आणि या टोळीनं त्यांना रेडहॅन्ड पकडून त्यांची बदनामी करायची असं कारस्थान रचलंवतं. पण तुकोबारायाला एवढं लेचेपेचे होतं व्हय? आवो, तुकोबा वरवरचे संत नव्हते. आतून बाहेरून अस्सल, शंभर नंबरी सोनं होतं ते.. भुललं नाय असल्या मोहाला. 

या अभंगातनं तुकोबारायांनी समस्त वारकर्‍यांना एक मोलाचा संदेशबी दिलाय. "परस्त्री रखुमाईसमान आहे". बाईकडं बघण्याची नजरच झटक्यात स्वच्छ होऊन जाते वो. शरीरसुखाचं आमिष दाखवणार्‍या बाईला "जाई वो तू माते" म्हणत दूर करायला लै लै लै टोकाचा संयम लागतो... तीसुद्धा एक बाई आहे, तिच्या शारिरीक इच्छा पूर्ण करून घ्यायचा तिला अधिकार आहे. त्या भावनेचा मान राखत, तिला सेक्सच हवा असेल तर बाहेर अनेक 'नर' आहेत, तिकडे तिनं जावं हे नम्रपणे सांगणं तर अफलातून आहे !

आपल्याला शब्दांचा, भाषेचा समर्पकपणे वापर शिकायचा असंल तर तुकारामांच्या अभंगांसारखं साधन नाय! शेवटच्या ओळीत तुकोबारायांनी 'पुरूष' हा शब्द न वापरता 'नर' हा शब्द वापरलाय. इथं प्रतिभेची झलक दिसते. फक्त सेक्ससाठी एकत्र येतात ते 'नर-मादी'. 'पुरूष आणि स्त्री'मध्ये काहीतरी भावबंध निर्माण व्हावे लागतात!

माझ्या दोस्तांनो, अफाट-अचाट-अफलातून माणूस होता आपला तुकोबाराया... खराखुरा संत. अस्सल समाजसुधारक. प्रतिभावान कवी ! जोपर्यन्त या पृथ्वीतलावर 'माणूस' आहे तोपर्यन्त ही गाथा तरणार आहे.. माणसाला हिताचा मार्ग दाखवत रहाणार आहे, अशी पोस्ट किरण माने यांनी लिहिली आहे.

पाहा पोस्ट

दरम्यान, किरण माने यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. खरं आहे माने जी तुमचं! परंतु इथे सर्व नरच दिसतात. पुरुष व्हायला कोणी तयारच नाही. नास्तिकतेचं पांघरून व्यसनाच्या आहारी जाताना दिसतात. साईबाबांनी सबुरीला परमपुरुषार्थ म्हटले आहे आणि तोच आत्ताच्या पिढीमध्ये दिसत नाही, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.