...म्हणून ललित प्रभाकर 'आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर गेला

Lalit Prabhakar Aatmapamphlet : ललित प्रभाकर हा एक उत्तम अभिनेता असून त्याला नेहमीच वेगवेगळं शिकायला प्रचंड आवडतं. अशात ललित प्रभाकर हा ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर दिसला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 4, 2023, 01:23 PM IST
...म्हणून ललित प्रभाकर 'आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर गेला title=
(Photo Credit : Social Media)

Lalit Prabhakar Aatmapamphlet : देखणेपणाने आणि आपल्या दर्जेदार अभिनयाने तरूणाईत विशेषतः तरूणींच्या  हृदयावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. ललित प्रभाकरने आजपर्यंत अनेक भूमिका साकारल्या. 'चिं व चि. सौ. का' सारख्या चित्रपटातील मस्तीखोर, अतरंगी मुलगा तर 'आनंदी गोपाळ' मधील शिस्तप्रिय, बायकोच्या पाठी खंबीरपणे उभा राहाणारा नवरा. ललितच्या अभिनयाच्या छटा आपण अनेकदा पाहिल्या. आता ललितची आणखी एक नवीन बाजू प्रेक्षकांसमोर आली आहे. ललित ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर पडद्यामागील कलाकारांसोबत त्यांना मदत करताना दिसला. आता त्यानं हे असे का केलं याचे कारण ललितनं स्वतःच सांगितले आहे. 

काय म्हणाला ललित प्रभाकर?

‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटात काम करण्यावर ललित प्रभाकर म्हणतो, 'आशिष माझा खूप जवळचा मित्र आहे आणि त्याच्या पहिल्या चित्रपटाचा मला भाग व्हायचे होते. आशिष एक व्यक्ती म्हणून तर उत्तम आहेच याशिवाय एक दिग्दर्शक म्हणूनही तो सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळे त्याच्या या प्रोजेक्टमध्ये माझा काहीतरी सहभाग असावा, असे मला मनापासून वाटत होते. त्यामुळे मी सेटवर जाऊन त्याला थोडी मदत करण्याचा प्रयत्न केला. हा अनुभव माझ्यासाठीही खूप मस्त होता. त्यात झी स्टुडिओज, परेश मोकाशी यांच्यासोबतही माझे एक वेगळे नाते आहे. त्यामुळे या प्रोजेक्टच्या निर्मितीमध्ये थोडा फार का होईना, माझा हातभार लागला आणि याचा मला विशेष आनंद आहे. या चित्रपटातील बालकलाकार सगळेच एकदम जबरदस्त आहेत. काय कमाल अभिनय करतात ही मुले. त्यांच्यासोबतही थोडी मजामस्ती केली.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : लोकप्रियता मिळण्याआधी अशी दिसायची समांथा, व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही ओळख पटेना

या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर 73 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘जनरेशन 14 प्लस' स्पर्धा प्रकारात या चित्रपटाची निवड झाली आहे.'आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट एका तरुण मुलाभोवती फिरणारा आहे, जो त्याच्या क्लासमेटच्या प्रेमात पडतो. ही एकतर्फी प्रेमाची हृदयस्पर्शी कहाणी आहे, जी त्याच्या भोवतालच्या नाट्यमय सामाजिक-राजकीय बदलांच्या पलीकडे जाणारी आहे. 'आत्मपॅम्प्लेट' या चित्रपटात ओम बेंडखळे , प्रांजली श्रीकांत , भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तप या चित्रपटाची निर्मिती ही भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी व  झी स्टुडिओ प्रस्तुत मयसभा करमणूक मंडळ यांनी केली. तर या चित्रपटाचे लेखन हे परेश मोकाशी यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष बेंडे यांनी केले आहे.  येत्या 6 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.