याला म्हणतात खरा देशभक्त! Javed Akhtar यांनी पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवरुन सुनावलं, Kangana ही म्हणाली "क्या बात'

लाहोरमध्ये झालेल्या फैज फेस्टिव्हल 2023 (Lahore Faiz Festival 2023) मध्ये जावेद अख्तर (Javed Akhtar) सहभागी झाले होते. यावेळी त्यांना पाकिस्तानला (Pakistan) खडेबोल सुनावले आणि दहशतवाद्यांना (Terrorist) आसरा देण्यावरुन सुनावलं. ते म्हणाले की "आम्ही तर मुंबईचे लोक आहोत, आमच्या शहरावर कसा हल्ला झाला हे आम्ही पाहिलं. ते लोक नॉर्वे किंवा इजिप्तवरुन तर आले नव्हते. ते लोक तुमच्याच देशात फिरत आहेत".  

Updated: Feb 21, 2023, 02:52 PM IST
याला म्हणतात खरा देशभक्त! Javed Akhtar यांनी पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवरुन सुनावलं, Kangana ही म्हणाली "क्या बात' title=

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) पाकिस्तानमधील फैज फेस्टिव्हलमध्ये (Lahore Faiz Festival 2023) सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत जावेद अख्तर यांनी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत पाकिस्तानला (Pakistan) खडेबोल सुनावले आहेत. दहशतवाद्यांना आपल्या देशात आसरा देण्यावरुन जावेद अख्तर यांनी नाराजी जाहीर करत टीका केली आहे. तुमच्या देशात दहशतवादी अजूनही फिरत आहेत असं ते जाहीरपणे म्हणाले.

जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

जावेद अख्तर यांनी फैज फेस्टिव्हल 2023 मध्ये म्हटलं की "आम्ही नुसरत आणि मेहंदी हसन यांचे मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले. पण तुमच्या देशात लता मंगेशकर यांचा कोणताही मोठा कार्यक्रम झाला नाही. आता आपण एकमेकांवर आरोप करुन काही साध्य होणार नाही. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या जे वातावरणं गरम आहे ते कमी झालं पाहिजे. आम्ही तर मुंबईचे लोक आहोत. आमच्या शहरावर कशाप्रकारे हल्ला झाला हे आम्ही पाहिलं आहे. ते लोक नॉर्व किंवा इजिप्तवरुन तर आले नव्हते. ते लोक आताही तुमच्या देशात फिरत आहेत. त्यामुळे जर एखाद्या भारतीयाच्या मनात याची तक्रार असेल, तर तुम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही".

जावेद अख्तर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवरुन सुनावल्याने सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. एका युजरने संपूर्ण व्हिडीओ पाहायला मिळाला तर मजा येईल असं म्हटलं आहे. तर एका युजरने ही देशभक्ती असल्याचं सांगत भारतरत्न देण्याची मागणी करुन टाकली आहे. काहींनी आपल्या मनात जावेद अख्तर यांच्याप्रती आदर वाढला असल्याचं सांगितलं आहे. 

कंगनानेही केलं कौतुक

जावेद अख्तर यांच्या देशभक्तीवर कंगनाही (Kangana Ranaut) व्यक्त झाली असून ट्वीट करत तिने पाकिस्तानला घऱात घुसून मारलं असा टोला लगावला आहे. "जेव्हा कधी मी जावेद अख्तर यांची कविता ऐकते, तेव्हा सरस्वती देवीची त्यांच्यावर कृपा आहे असं वाटतं. व्यक्तीमध्ये खरेपणा असतो तेव्हाच दैवत्व त्यांच्यासह असतं. घऱात घुसून मारलं...हाहाहा", असं ट्विट कंगनाने केलं आहे. 

लाहोरमध्ये तीन दिवसांच्या फैज फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. 17 ते 19 फेब्रुवारीदरम्यान हा फेस्टिव्हल पार पडला. या फेस्टिव्हलमध्ये जावेद अख्तर यांनी मुशायरात सहभाग घेतला, तसंच आपलं नव पुस्तकही लाँच केलं.