Samay Raina Net Worth: समय रैनाचा शो इंडियाज गॉट लेटेंट सध्या वादात अडकलाय. या शोमध्ये यूट्यूबर रणबीर अलाहबादीया पाहुणा म्हणून आला होता. त्याने आई-वडिलांसंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं. यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावर कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे रणबीर अलाहबादिया आणि समय रैना सध्या चर्चेत आहेत. विनोदी कलाकार आणि युट्यूबर समय रैनाचा कॉमेडी शो इंडियाज गॉट लेटेंट यूट्यूबवर खूप व्हायरल झाला आहे. तरुणांमध्ये हा शो खूप लोकप्रिय ठरलाय. परीक्षकांनी दिलेले गुण आणि स्पर्धकाने स्वत:ला दिलेले गुण सारखे असले तर त्या स्पर्धकाला शोच्या तिकीट विक्रीद्वारे जमा झालेले पैसे दिले जातात. अशावेळी समय रैना कशी कमाई करतो? त्याचे नेटवर्थ काय आहे? असे प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असेल. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, समय रैनाची एकूण संपत्ती $16.5 दशलक्ष म्हणजेच साधारण 140 कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते. हा आकडा केवळ त्याच्या YouTube चॅनेलच्या कमाईवर आधारित आहे. ज्यामध्ये जाहिराती, सदस्यता आणि इतर डिजिटल स्रोतांचा समावेश आहे. असे असले तरी त्याची कमाई फक्त YouTube पुरती मर्यादित नाही. तो स्टँड-अप कॉमेडी शो, ब्रँड पार्टनरशिप आणि चेस स्ट्रीमिंगमधूनही चांगली कमाई करतो.
'इंडियाज गॉट लेटेंट' हा प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'इंडियाज गॉट टॅलेंट' चा एक मजेदार विडंबनात्मक आवृत्ती आहे. यामध्ये नवीन कलाकारांना त्यांची विनोदी कला दाखवण्याची संधी मिळते. हा शो त्याच्या मजेदार अनुभवासाठी आणि विनोदी शैलीसाठी ओळखला जातो. इन्फ्ल्युएन्सर आयुष्मान पंडिताच्या मते, समय रैना या शोमधून दरमहा सुमारे 1.5 कोटी रुपये कमवतो. शोमधील काही खास आणि वादग्रस्त कंटेंट फक्त 'मेंबर्स ओन्ली' प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. ज्यामुळे त्यांची कमाई आणखी वाढते.
समय रैनाचा जन्म जम्मूमध्ये एका पत्रकार कुटुंबात झाला. कोरोना महामारीच्या काळात त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात YouTubeवर लाइव्ह बुद्धिबळ स्ट्रीमिंगद्वारे केली. त्याच्या मजेदार भाष्य आणि अनोख्या शैलीमुळे तो इंटरनेट सेन्सेशन बनला. यानंतर, त्याने 'कॉमिकस्टान' सीझन २ मध्ये भाग घेतला आणि तो विजेता ठरला. ज्यामुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली. या यशानंतर, त्याने अभिषेक उपमन्यूसह अनेक प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियनसाठी शो सुरू केले. आजच्या घडीला समय रैना त्याच्या विनोदबुद्धीमुळे भारतातील सर्वात प्रिय विनोदी कलाकारांपैकी एक बनला आहे. असे असले तरी काही वादग्रस्त विनोदांमुळे तो नेहमी टिकेचा धनी होत राहिला आहे.
रणवीर अलाहबादियाने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी युट्यूबच्या जगात प्रवेश केला. त्याचे बीअरबायसेप्ससह एकूण सात युट्यूब चॅनेल आहेत. या चॅनेल्सवर फिटनेस, सेल्फ अवेअरनेस आणि प्रेरणादायी माहिती सादर केली जाते. या सर्व चॅनेल्सना एकत्रित केल्यास बेअर बायसेप्स म्हणजेच रणवीरचे एक कोटींहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार तो या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे दरमहा 35 लाख रुपये कमवतो. त्याचे उत्पन्न मुळात YouTube जाहिराती, रॉयल्टी आणि ब्रँडमधून येते. रणवीरचा व्हिडिओ अपलोड होताच त्याला लाखो व्ह्यूज मिळतात. समोर आलेल्या माहितीनुसार 2024 पर्यंत रणवीर अलाहाबादियाची एकूण संपत्ती 60 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तो भारतातील सर्वात श्रीमंत YouTubers पैकी एक आहे. रणवीरची संपत्ती इतकी प्रचंड असूनही त्याला गाड्यांचा विशेष शौक नाही. त्याच्याकडे स्कोडा कोडियाक कार आहे ज्याची किंमत 34 लाख रुपये आहे.