'इंडियाज गॉट लेटेंट'मध्ये पालकांच्या लैंगिक संबंधांवर आक्षेपार्ह शब्दांमध्ये रणवीर अलाहाबादिया याने वादग्रस्त विधान केलं. यानंतर बराच गदारोळ सुरू आहे. या प्रकरणात, युट्यूबर रणवीर अलाहाबादियासह 5 हून अधिक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर 'अश्लीलतेला' प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. एवढंच नव्हे तर एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्स वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले- आज गुवाहाटी पोलिसांनी काही युट्यूबर्स आणि सोशल इन्फ्लुएंसरविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
सीएम सरमा यांनी पुढे लिहिले- 'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन देणे आणि लैंगिक आणि अश्लील चर्चांमध्ये सहभागी होणे यासाठी गुवाहाटी गुन्हे शाखेने सायबर पीएस केस क्रमांक 03/2025 अंतर्गत कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. बीएनएस २०२३ क्रमांक 79/95/294/296, आयटी कायदा 2000 च्या कलम 67, सिनेमॅटोग्राफ कायदा 1952 च्या कलम 4/7, महिलांचे अश्लील प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायदा 1986 च्या कलम 4/6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या चौकशी सुरू आहे.
पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया याने इंडियाज गॉट लेटेंटमध्ये एक वादग्रस्त विधान केले होते. त्याने पालकांच्या लैंगिक संबंधांवर भाष्य करणारा प्रश्न अतिशय आक्षेपार्ह शब्दांमध्ये विचारला होता. ज्यासाठी त्याला खूप ट्रोल केले जात आहे. रणवीरने त्याच्या विधानाबद्दल माफी मागितली आहे आणि त्याने जे म्हटले त्याबद्दल आपल्याला पश्चात्ताप होत असल्याचे म्हटले आहे. पण असे असूनही, त्याच्या मागचा त्रास मात्र काही संपत नाही.