ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचं निधन

समांतर सिनेमाला वेगळ्या आणि तितक्याच प्रभावीपणे मांडण्यासाठी .... 

Updated: Jun 4, 2020, 02:01 PM IST
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचं निधन  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून या कलाविश्वात नावाजलेल्या बासू चॅटर्जी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबईत त्यांचं निधन झालं. वृद्धापकाळानं चॅटर्जी यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

समांतर सिनेमाला वेगळ्या आणि तितक्याच प्रभावीपणे मांडण्यासाठी चॅटर्जी ओळखते जात होते. किंबहुना येत्या काळातही चित्रपचप्रेमी आणि अभ्यासकांसाठी त्यांचे काही चित्रपच हे आदर्शस्थानी असतील यात शंका नाही. 'छोटी सी बात', 'रजनीगंधा', 'बातों बातों मे', 'एक रुका हुआ फैसला', 'चमेली की शादी' या चित्रपटांसाठी त्यांच्या दिग्दर्शनाला अनेकांचीच दाद मिळाली होती. 

चॅटर्जी यांच्या निधनाचं वृत्त कळताच दिग्दर्शकांच्या वर्तुळातून एक आधारस्तंभ हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. हिंदीसोबतच चॅटर्जी यांनी बंगाली कलाविश्वातही महत्त्वपूर्ण योगदान दिलं. सत्तरच्या दशकात साहसदृश्यांवर भर देत 'ऍंग्री यंग मॅन'चा काळ असतानाच अशा परिस्थितीमध्ये समांतर चित्रपटांमध्ये जीव ओतून तेसुद्धा त्याच ताकदीनं प्रेक्षकांपुढे मांडणाऱ्या चॅटर्जी यांची बातच काही और. अमोल पालेकर यांच्यासोबतचं त्यांचं समीकरण विशेष गाजलं. 

 

अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, देव आनंद, मिथुन चक्रवर्ती यांसारख्या अभिनेत्यांनाही त्यांनी आव्हानात्मक भूमिकांतून प्रेक्षकांपुढं सादर केलं. राष्ट्रीय पुरस्कारांसह इतरही अनेक पुरस्कारांनी त्यांचा आणि त्यांच्या कलाकृतींचा गौरव करण्यात आला. बासू चॅटर्जी यांनी जगाचा निरोप घेतला असला तरीही अद्वितीय कलाकृतींच्या रुपात मात्र ते कायमच सर्वांच्या मनात राहतील.