मुंबई : भजन सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुप जलोटा यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत आहे. 'बिग बॉस' या वादग्रस्त कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होत त्यांनी अनेकांना थक्क केलं. त्यामागोमागच आपल्याहून वयाने ३७ वर्षे लहान असणाऱ्या जसलीन मथारु हिच्यासोबतच्या रिलेशनशिपमुळे तर जलोटा यांना अनेकांच्या टीकांचाही सामना करावा लागला.
'बिग बॉस'मधून बाहेर येताच त्यांनी आपल्याविषयी होणाऱ्या या सर्व चर्चा पाहता काही गोष्टी स्पष्ट केल्या. जसलीनसोबत आपण रिलेशनशिपमध्ये नसल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.
तिच्यासोबतचं नातं हे एका गुरु-शिष्याच्या नात्याप्रमाणे असल्याचंही त्यांनी सांगितलं. ज्यामागोमागच आता त्यांनी 'बिग बॉस' या कार्यक्रमामुळे आपलं आर्थिक नुकसान झाल्याचं म्हटलं आहे.
'आप की अदालत' या कार्यक्रमात त्यांनी हा खुलासा केला. शिवाय आपण फक्त भजनं गात असल्यामुळे संतपुरुष असल्याप्रमाणे न वागवण्याचा सल्ला प्रेक्षकांना दिला आहे.
आपल्या आर्थिक अडचणीविषयी जलोटा यांनी सांगितल्यानंतर आता या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. त्यामुळे आता येत्या काळात या साऱ्याचे काय पडसाद असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दरम्यान, जलोटा यांनी कार्यक्रमातून बाद झाल्यानंतर केलेल्या गौप्यस्फोटांविषयी माहिती मिळताच जसलीनने त्यांच्यावर आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं होतं.