मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी'ने रिलीज होण्यापूर्वीच खळबळ उडवून दिली आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना राणौत दिसणार आहे. तिच्या लूकने तर सगळ्यांची बोलती बंद केली. दिवंगत राजकारणी जय प्रकाश नारायण यांच्या भूमिकेत अनुपम खेर यांनी सर्वांनाच चकित केले आहे. दरम्यान, भारतरत्न पुरस्कारप्राप्त माजी पंतप्रधान आणि भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आता समोर आले आहे. या भूमिकेसाठी श्रेयस तळपदेला कास्ट करण्यात आले आहे.
श्रेयसनं त्याच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करत त्याचा चित्रपटातला फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणारा श्रेयस तळपदेचा लूकनं आश्चर्यचकित केले आहे. या पोस्टरमध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या तरुण वयाची झलक पाहायला मिळत आहे. हा लूक शेअर करताना, श्रेयसनं कॅप्शनमध्ये अटलबिहारी वाजपेयींची एक कविता शेअर केली आहे. बाधाएं आती हैं आएं, घिरें प्रलय की घोर घटाएं, पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसें यदि ज्वालाएं, निज हाथों में हंसते-हंसते, आग लगाकर जलना होगा। कदम मिलाकर चलना होगा।, असे या कवीतेचे बोल आहेत.
'भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी या सर्वांत लाडक्या, दूरदर्शी, खऱ्या देशभक्त आणि जनसामान्यांपैकी एकाची भूमिका केल्याचा सन्मान आणि आनंद होत आहे. मला आशा आहे की मी अपेक्षा पूर्ण करेन. मी अटलजींच्या भूमिकेत योग्य दिसेन हा विचार केल्याबद्दल कंगना रणौतचे धन्यवाद. तुम्ही निःसंशयपणे आमच्या देशातील सर्वात प्रतिभावान आणि अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहेस, परंतु तुम्ही तितकीच चांगली अभिनेत्री आणि दिग्दर्शक आहेस', असे कॅप्शन दिले.
दरम्यान, कंगनानं शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत श्रेयस योग्य निवड आहे असे म्हटले आहे. कंगनाच्या पोस्टवर शानदार, वाह, काय निवड, सर्वोत्तम निवड अशा कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले - व्वा, आणीबाणीचे सत्य समोर आणण्यासाठी सर्वोत्कृष्ट कलाकार एकत्र आले. दुसर्या नेटकऱ्याने लिहिले, आशा आहे की श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत धमाल करणार.