Aishwarya Rai At Cannes 2023 : बॉलिवूड अभिनेत्री Aishwarya Rai Bachchan दरवर्षीप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा कान्स चित्रपट सोहळ्यासाठी पोहोचली आणि तिथं तिच्या एका नजरेत अनेकजण घायाळ झाले. आतापर्यंत प्रत्येक वेळी ऐश्वर्या जेव्हाजेव्हा कान्स सोहळ्यासाठी आली, तेव्हातेव्हा तिनं नेहमीच फॅशनच्या चौकटीबाहेर जाणाऱ्या पेहरावाला पसंती दिली. फार नजाकतीनं तिनं प्रत्येक लूक कॅरी केला. यंदाचं वर्षही त्याला अपवाद ठरलं नाही.
Cannes 2023 च्या रेड कार्पेट इवेंट आणि एका स्क्रीनिंगसाठी पोहोचलेली ऐश्वर्या यावेळी चंदेरी रंगाच्या चमचमणाऱ्या सिक्लीन हूड गाऊनमध्ये दिसली. पायघोळ आणि मागं लांब ट्रेन असणाऱ्या या गाऊनमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं होतं. ऐश्वर्या रेड कार्पेटवर आली आणि तिथं असणाऱ्या सर्वांच्या नजरा वळल्या. ती येताच एक वेगळं वातावरण कान्सच्या रेड कार्पेटवर पाहायला मिळालं. तिची एक झलक टीपण्यासाठी छायाचित्रकारांनी गर्दी केली, त्यांचीही धांदल उडाली.
ऐश्वर्याही तिथं थांबून फोटोसाठी पोझ देत होती. तितक्यातच तिचा गाऊन व्यवस्थित करण्यासाठी एक माणूस पुढे आला. तो तिच्याच टीमचा एक भाग होता. कारण, ऐश्वर्या हॉटेलहून कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी निघाली तेव्हाही त्यानं तिच्या गाऊनची ट्रेन सावरून धरल्याचं पाहायला मिळालं होतं.
ऐश्वर्याच्या या लूकची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली. अनेकांनीच तिचे फोटो शेअर करत या लूकची प्रशंसा केली. पण, त्यातच एका सेलिब्रिटीनं यातही वेगळाच मुद्दा उचलून धरला. हा सेलिब्रिटी म्हणजे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री. (Director Vivek Agnihotri Slams person Helping Aishwarya Rai On Cannes 2023 Red Carpet)
ट्विटरवर त्यानं ऐश्वर्याचा फोटो शेअर करत लिहिलं, 'तुम्ही कॉस्ट्युम स्लेव्ह हा शब्द ऐकलाय का? त्या सहसा मुली असतात. (इथं तो सुटाबुटातील माणूस) हल्ली भारतातही बऱ्याच महिला सेलिब्रिटींसोबत ही माणसं दिसतात. आपण, या अशा विचित्र फॅशनसाठी हा वेडेपणा का करतोय?'.
Have you guys heard of a term called ‘Costume Slaves’. They are mostly girls (a suited man in this case). You can see them now in India too with almost every female celeb. Why are we becoming so stupid and oppressive just for such uncomfortable fashion? pic.twitter.com/bWYavPYjvS
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) May 19, 2023
काहींनी विवेकच्या ट्विटवर त्याच्याच बाजूनं झुकणारी प्रतिक्रिया दिली. तर, ऐश्वर्याच्या चाहत्यांनी मात्र विवेकलाच धारेवर धरत त्याच्या विचारसणीवर टीका केली. काहींनीतर त्याच्या गतकाळातील ट्विटवरही प्रकाश टाकला. हे प्रकरण गंभीर वळण घेत असल्याचं पाहिल्यानंतर ऐश्वर्याच्या फॅशनवर मी काहीच बोललो नाही, माझं मत फक्त त्या 'Costume Slavery' च्या संकल्पनेबाबत होतं असं म्हणत सारवासारव केली.