मुंबई : कोरोना व्हायरसची दहशत जगभरात पसरली आहे. प्रत्येकजण या व्हायरसपासून स्वतःला रोखण्यासाठी सतर्क असून काही ना काही उपाय योजना करत असतात. केरळमध्ये देखील याची जागृकता दिसत आहे. यामुळे केरळ हे राज्य आपत्ती राज्य म्हणून घोषित केलं आहे. याचा फटका बॉलिवूडला होत आहे.
रोनी स्क्रूवाला यांच्या 'सितारा' सिनेमाचं शुटिंग रद्द करण्यात आलं आहे. या सिनेमाचं शुटिंग 12 फेब्रुवारीपासून सुरू होणार होतं. पण सध्या कोरोना व्हायरसमुळे हे शुटिंग रद्द करण्यात आलं आहे. याची माहिती दिग्दर्शक वंदना कटारिया म्हणतात की, 'आमच्यासाठी टीमचं आरोग्य सर्वात महत्वाचं आहे. आमची टीम केरळमध्ये 30 जानेवारी रोजी पोहोचली होती. जवळपास 5 दिवस सगळी परिस्थिती पाहून टीमला पुन्हा बोलवण्यात आलं. पुढे थोडा विचार करून आणखी काय करता येईल याचा विचार करूया.'('या' डॉक्टरकडून कोरोना व्हायरसचा पहिला इशारा)
या सिनेमात शोभिता धुलिपाला मुख्य भूमिकेत होती. हा पहिला सिनेमा नाही ज्याची शुटिंग कोरोना व्हायरसमुळे रद्द झाली आहे. फक्त केरळमध्येच नाही तर इतर देशातही कोरोनामुळे सिनेमांच शुटिंग रद्द करण्यात आल्या आहेत. नागार्जून आणि सैयामी खेर यांचा 'वाइल्ड डॉग' या सिनेमाचं थायलंडमधील शुटिंग रद्द करण्यात आलं.
चीनमधून सुरू झालेल्या या कोरोना व्हायरसची लागण अनेकांना झाली आहे. चीनमधून पसरलेला हा कोरोना व्हायरस आता इतर देशांमध्ये देखील पोहोचला आहे. चीनचे शेजारी देश असल्यामुळे भारताला देखील याची भीती आहे. यामुळे भारत सरकारने या व्हायरसला थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. भारतातही काही संशयित आढळल्याने घबराट निर्माण झालीयं. केरळमध्ये काही संशयित रुग्ण आढळलेत. त्यामुळे केरळलगत असलेल्या कोकणातील बंदरांत येणाऱ्या बोटींवर आरोग्य खात्यातर्फे खास तपासणी यंत्रणा राबवली जातेय.