मुंबई : झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाने महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावलं. 'हसताय ना? हसायलाच पाहिजे...' असा प्रश्न विचारत या कार्यक्रमाने प्रेक्षकांशी आपुलकीचं नातं जोडलं. बॉलिवूडला मराठी कार्यक्रमाची दखल घ्यायला भाग पाडली ती याच कलाकारांनी.
या कार्यक्रमात डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके ही मंडळी आहेत. हे कलाकार विनोदी असले तरी त्यांनी कायमच आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला खळखळवून हसवणारा अभिनेता कुशल बद्रिकेने भावनिक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
यामध्ये कुशलने 'झी मराठी' वाहिनीचे आभार मानले आहेत. कुशलने या पोस्टमध्ये आपल्या आईचे देखील आभार मानले होते. यामध्ये कुशल बद्रिकेने आपल्या लहानपणीच्या दिवसांना उजाळा दिला आहे. तो म्हणतो,'लहानपणी प्रगतीपुस्तकाच्या लाल शेरा ने नालायक ठरलेला मी, दिसायला काळा बेंद्रा, येडा गबाळा बर्याचदा, बर्याच जणांना नकोसा झालेला मी, दिवसभराचे सगळे अपमान, मार, दुख: घेऊन तुझी कुस भिजवून टाकणारा मी.
झी मराठीने 'झी मराठी अवॉर्ड्स २०१९' या सोहळ्यात या विनोदवीरांच्या आईंना बोलवून त्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची ओळख या कलाकारांच्या आईशी होणार आहे. या विनोदवीरांच्या हस्ते त्यांच्या आईंना एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. खुद्द आईच्या तोंडून कौतुक आणि आतापर्यंतच्या संघर्षाची गोष्ट ऐकताना नेहमी सगळ्यांना हसवणाऱ्या या कलाकारांचे डोळे मात्र पाणावले. पण झी मराठी अवॉर्ड्सच्या मंचावर झालेली हि त्यांची भेट, हे एक सुंदर सरप्राईज ते कधीच विसरणार नाही असे होते.