मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan Birthday) आज वाढदिवस आहे. मात्र वाढदिवसापूर्वीच साप चावल्यानं (Snake) सलमानला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. त्याची प्रकृतीत उत्तम असल्यानं चाहत्यांचा जीव भांड्यात पडलाय. सलमानला हा साप नेमका कसा चावला, सलमानसोबत त्यावेळी काय घडलं,याबाबत सलमाननेच सांगितलं आहे. (Bollywood Star Actor Salman Khan Birthday Panvel Farm House Snake)
वाढदिवसाची पूर्वसंध्या सलमानसाठी अतिशय वाईट ठरली. पनवेलच्या फार्महाऊसवर सेलिब्रेशनसाठी आलेल्या सलमानला साप चावला आणि त्याला कामोठ्यातल्या MGM हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं. हॉस्पिटलमध्ये 6 तास उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर सलमाननं माध्यमांसमोर येत आपबिती सांगितली.
सलमानच्या फार्महाऊसमध्ये ज्यावेळी साप आला तेव्हा त्यानं हातात लाकूड घेऊन सापाला दूर फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र हा साप त्याच्या हातावर चढला.
सलमाननं दुसऱ्या हातानं सापाला दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सापानं त्याच्या हाताला तीनदा चावा घेतला. साप चावल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची अँटी व्हेनम इंजेक्शन घ्यावी लागली. हा साप बिनविषारी असल्यानं मोठा अनर्थ टळला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, टायगरला यापेक्षा मोठं बर्थ डे गिफ्ट काय असू शकतं..