मुंबई : गेल्या काही काही काळापासून सोशल मीडियाच्या वापरात लक्षणीय वाढ झाली असल्याचं म्हटलं जात आहे. पण, अशीही काही मंडळी आहेत, ज्यांनी लॉकडाऊनच्या आधीपासूनच या अनोख्या विश्वाशी स्वत:ला एकरुप केलं आहे. यापैकीच एक चेहरा ठरत आहे एका ब़ॉलिवूड अभिनेत्रीचा.
ही अभिनेत्री म्हणजे समीरा रेड्डी. हिंदी चित्रपट विश्वातून आपल्या कारकिर्दीत नावारुपास येणाऱ्या समीरानं लग्नानंतर कुटुंबाला प्राधान्य दिलं. समीरा खऱ्या अर्थानं सुपरम़ॉम झाली. सोबतच सुनेच्या भूमिकेतही ती तितकीच यशस्वी ठरल्याचं पाहायला मिळत आहे.
याचाच प्रत्यय येत आहे तो म्हणजे एका व्हिडिओतून. खुद्द समीरानंच सोशल मीडियावर तिच्या सासूबाईंसोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सासुबाईंसोबतची तिची जुगलबंदी सध्या नेटकऱ्यांमध्ये कमालीची चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
कोण जास्त हक्क गाजवतं, कोण जेवण चांगलं बनवतं, तयार होण्यासाठी नेमकं कोण जास्त वेळ लावतं अशा काही प्रश्नांची उत्तरं या दोघी डोळे मिटून इशाऱ्यांच्या मदतीनं देत आहेत. हीच खरी या खेळाची गंमत. प्रश्नोत्तरांच्या या अनोख्या सत्रामध्ये अक्षय म्हणजेच समीराचा पती जास्त कोणाचं ऐकतो, असाही प्रश्न करण्यात आला. त्याचं उत्तर या दोघींनीही कोणत्या अंदाजात दिलं तो अंदाजच सध्या गाजत आहे.
समीरा आणि तिच्या सासूबाईंचीही जुगलबंदी पाहून अनेकांनाच त्यांच्या या सुरेख नात्याचा हेवा वाटत आहे. मुख्य म्हणजे या दोघींच्या वयामध्ये इतकं अंतर असून, ही समीराच्या सासूबाईंचा उत्साह कुठेच कमी पडल्याचं दिसत नाही. त्यामुळं सासू- सुनेची ही जोडी खऱ्या अर्थानं धमाकेदार आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.