दिशा पटानीच्या वडिलांची जवळच्या मित्राने केली 25 लाखांची फसवणूक, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची 25 लाखांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 16, 2024, 12:50 PM IST
दिशा पटानीच्या वडिलांची जवळच्या मित्राने केली 25 लाखांची फसवणूक, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल title=

Disha Patani Father Cheated Of Rs 25 Lakh: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचे वडील जगदीश सिंह पटानी यांची फसवणूक झाल्याची एक बातमी समोर आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांच्या मते या लोकांनी दिशा पटानीच्या वडिलांना सरकारमध्ये मोठ्या पदावर अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष बनवण्याचे वचन दिले होते. त्यासाठी त्यांनी 25 लाख रुपये घेतले होते. बरेली पोलीस स्टेशनचे एसएचओ डीके शर्मा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

जगदीश सिंह पटानी यांच्याकडून शुक्रवारी रात्री शिवेंद्र प्रताप सिंह, दिवाकर गर्ग, जय प्रकाश, प्रति गर्ग यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे, फसवणूक, बनावटगिरी आणि पैशांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली बरेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. यावेळी त्यांनी आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं आहे. 

 25 लाखांची फसवणूक

अभिनेत्री दिशा पटानीच्या वडील हे सेवानिवृत्त डीएसपी आहेत. बरेली पोलीस स्टेशनच्या सिव्हिल लाइन्स परिसरात ते राहतात. त्यांनी रात्री बरेली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये त्यांनी शिवेंद्र प्रताप सिंह यांना वैयक्तिकरित्या ओळखत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी दिशा पटानीच्या वडिलांची ओळख दिवाकर गर्ग आणि जयप्रकाश यांच्याशी करून दिली. शिवेंद्र यांनी आपल्या दिशा पटानीच्या वडिलांना राजकीय संबंधांचा हवाला दिला. ज्यामध्ये त्यांना सरकारी आयोगात अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा इतर कोणत्याही मोठ्या पदाचे आश्वासन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर दिशा पटानीच्या वडिलांनी त्यांना 25 लाख रुपये दिले. यातील 5 लाख रुपये रोख आणि 20 लाख  3 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. 

सरकारमध्ये मोठ्या पदाचे आश्वासन

जेव्हा पैसे देऊन 3 महिने झाले तरी कुठलेच काम झाले नाही. त्यानंतर जगदीश सिंह यांनी त्यांना पैसे परत मागितले. त्यानंतर त्यांना धमकी येण्यास सुरुवात झाली. जगदीश सिंह यांनी सांगितले की, त्यांनी राजकीय संबंधांचे खोटी माहिती दिली. हिमांशु नावाच्या व्यक्तीला त्यांनी विशेष कर्तव्य अधिकारी असल्याचे सांगून त्यांनी फसवणूक केली. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जावून तक्रार दाखल केली.