मुंबई : संपूर्ण देशात विविध वर्गांमध्ये सध्याच्या घडीला Citizenship Amendment Act नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयीचं वातावरण गंभीर वळण घेताना दिसत आहे. त्यातच जामिया मिल्लिया इस्लामिया Jamia Millia Islamia विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे देशातील बऱ्याच विद्यापीठांतील विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनता या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ सूर आळवत आहे. यामध्ये काही कलाकार मंडळींनीही पुढाकार घेतला आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत बऱ्याच सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यावर आता अभिनेत्री दिया मिर्झा हिनेही तिची प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट करत दिया मिर्झाने हा सर्व प्रकार पाहता शरमेनं मान खाली गेली अशी प्रतिक्रिया दिली.
'आपल्या देशात जे काही सुरु आहे त्यामुळे मान शरमेनं खाली करावी. लाज वाटते याची. आता सर्वांनीच एकत्र येण्याची गरज आहे आणि एक राष्ट्र म्हणून ठामपणे उभं राहण्याची गरज आहे', असं ट्विट करत आताच्या आता पावलं उचलली जाण्याची गरज असल्याचा मुद्दा दियाने अधोरेखित केला. तिच्या या ट्विटमधून संताप्त सूरच आळवला गेला.
What is happening in our country should make us all hang our heads in shame. Shame. Now is the time to come together and act as one nation, one people, one country. NOW.
— Dia Mirza (@deespeak) December 16, 2019
फक्त दिया मिर्झाच नव्हे, तर महेश भट्ट, अनुराग कश्यप, झीशान आयुब, पूजा भट्ट आणि स्वरा भास्कर या कलाकारांनीही या हिंसाचाराप्रकरणी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. मुख्य म्हणजे काही चाहत्यांनी या विद्यापीठातील हिंसाचारानंतर आता अभिनेता शाहरुख खान यानेही या प्रकरणी काहीतरी पाऊल उचलावी अशी आर्जव केली आहे. या गंभीर मुद्द्यावर त्याने मौन राहू नये असं आवाहन त्याला करण्यात आलं आहे.