मुंबई : 'मुल्क', 'जाने तू या जाने ना', 'छिछोरे' यांसारख्या चित्रपटांमधून झळकलेला एक अभिनेता आजही कलाविश्वात त्याची वेगळी ओळख प्रस्थापित करण्यासाठी धडपडत आहे. एकेकाळी म्हणे या अभिनेत्याला अमली पदार्थांचं इतकं व्यसन लागलं होतं की त्याला व्यसनमुक्ती आणि सुधारणागृहातही पाठवावं लागलं होतं. हो अभिनेता म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतिक बब्बर.
काही वर्षांपूर्वीच्या एका मुलाखतीत प्रतिकने त्याच्या जीवनातील या संघर्षाच्या काळाविषयी 'मिड-डे'ला दिलेल्या मुलाखतीत उलगडा केला होता. वयाच्या १३व्या वर्षी प्रतिकने पहिल्यांचा अमली पदार्थांचं सेवन केलं होतं. याचविषयी सांगताना तो म्हणाला होता, ''बालपणी मी बऱ्याच अडचणींचा सामना केला होता. मनतल्या कोलाहलापासून अमली पदार्थच मला दूर नेत होते. सुरुवातीला गांजा आणि चरस यांसारख्या पदार्थांनंतर मी 'हार्ड ड्रग्स'कडेही वळलो होतो. माझे बरेच मित्र वेळेसोबत या साऱ्यापासून दूर गेले होते. पण, मी मात्र व्यसनाधीन झालो होतो.''
अनेकदा तुम्हाला अमली पदार्थांचं व्यसन लागतं तेव्हा लोकं तुमच्याविषयी पूर्वग्रह बांधण्यास सुरुवात करतात असं म्हणत अनेकदा तर, तुम्ही व्यसनाधीन आहात ही बाबसुद्धा स्वीकारत नसल्याची महत्त्वाची गोष्ट त्याने सर्वांसमोर ठेवली. 'मुळात जीवनातील त्या दिवसांमध्ये मुली आल्या आणि गेल्याही पण, अमली पदार्थांनी मात्र माझा पाठलाग सोडला नाही. आयुष्याचा आनंद लुटण्याचा हाच एक मार्ग असल्याचं मला वाटायचं. पण, एका अमली पदार्थाच्या प्रमाणाबाहेरील सेवनामुळे मी माझ्याच आयुष्याशी काय करत आहे, हा विचार करायला मी भाग पडलो', असं तो त्या मुलाखतीत म्हणाला होता.
बालपणीच व्यसनाधीन गेलेल्या प्रतीने दोन वेळी व्यसनमुक्ती आणि सुधारणा गृहात जात या साऱ्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. आजच्या घडीला तो या साऱ्यातून पूर्णपणे सावरला आहे. शिवाय अभिनय कारकिर्दीकडेही तो अतिशय गांभीर्याने पाहात आहे. आपण प्रसिद्धीझोतात आलो तरी ठीक, नाही आलो तरी ठीक असा दृष्टीकोन ठेवणाऱ्या प्रतिकचं या कलेवर नितांत प्रेम आहे. त्यामुळे आयुष्यभर या कलेच्याच बळावर जगण्याचा त्याचा मानस आहे.