मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) नेहमीच काही ना काही मुद्द्यांवर चर्चा करताना, सामाजिक कार्यामध्ये पुढे येत सहभागी होताना दिसते. आता पुन्हा एकदा रवीनाने एका मुद्यावरुन जनतेला आवाहन केलं आहे. रवीनाने पालघर मॉब लिचिंग प्रकरणात मृत्यू झालेल्या ड्रायव्हरच्या कुटुंबियांसाठी जनतेकडे मदतीचं आवाहन केलं आहे.
लॉकडाऊन दरम्यान दोन साधुंसोबत गेलेल्या 29 वर्षीय ड्रायव्हरवर 200 जणांहून अधिक असलेल्या समूहाकडून हल्ला करण्यात आला. 'बॉलिवूडलाईफडॉटकॉम'ने दिलेल्या वृत्तानुसार, रवीना टंडनने मृत ड्रायव्हरच्या कुटुंबासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
A fund raiser for the 29 yr old driver who was lynched along with hindu sadhus He leaves behind two little girls , please do your bit and help this family . https://t.co/dV8HbvrHRS
— Raveena Tandon (@TandonRaveena) April 23, 2020
एका वेबसाईटची लिंक देत रविनाने ट्विट केलं आहे. 'साधुंसोबत मॉब लिचिंगमध्ये मृत्यू झालेल्या 29 वर्षीय ड्रायव्हरसाठी फंडरायझर, त्यांना दोन लहान मुली आहेत. कृपया आपल्यापरिने होईल तितकी या कुटुंबासाठी मदत करा' असं ट्विट करत रवीनाने सर्वांना मदतीचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरस संकटात अफवा पसरण्यापासून रोखण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनने #jitegaIndiajitengehum या नावाने अभियानही सुरु केलं होतं. या अभियानासह तिने लोकांना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला न करण्याचंही आवाहन केलं.
भारतात आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर गेल्या काही दिवसांत हल्ला झाल्याचं समोर आलं. त्यानंतर रवीनाने याबाबत एक खास व्हिडिओही बनवला होता. तिने सर्व डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील सर्वांनाच योग्य तो सन्मान देण्याचंही सांगितलं होतं.