Allu Arjun : अल्लू अर्जुन 2020 पासून सुकुमारच्या 'पुष्पा' आणि 'पुष्पा 2' या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. अशातच त्याने अनेक चित्रपटांना होकार दिला होता. परंतु, या चित्रपटांची शूटिंग करू शकला नाही. कारण तो लूक बदलू शकला नाही. आता अल्लू अर्जुन नवीन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करून सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने 'बाहुबली 2' चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकले असून सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये 'पुष्पा 2' चित्रपट पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
अल्लू अर्जुनच्या पुढील चित्रपटाबाबत नागा वामसी काय म्हणाले?
M9 शी बोलताना निर्माते नागा वामसी यांनी अलीकडेच अल्लू अर्जुनच्या आगामी चित्रपटांसंदर्भात माहिती दिली. दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवाससोबतचा त्याचा चौथा चित्रपटासंदर्भात त्यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की 2025 च्या उन्हाळ्यात चित्रपट फ्लोरवर जाण्यापूर्वी अभिनेता त्याच्या देहबोली आणि भाषेवर काम करणार आहे.
चित्रपटाच्या नावाबाबत विचारले असता नागा वामसी म्हणाले की, जवळपास चित्रपटाचे स्क्रिप्टिंग आम्ही पूर्ण केलं आहे. अल्लू अर्जुन जेव्हा फ्री होईल तेव्हा त्याची तयारी करण्यासाठी तो त्रिविक्रमला भेटेल. त्यावेळी तो त्याच्या देहबोली आणि तेलुगू भाषावर काम करेल. यावर खूप काम करावे लागणार आहे. त्यामुळे आम्हाला वाटते की पुढच्या उन्हाळ्यात चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होईल. यासाठी आम्हाला एक खास सेट देखील बनवावा लागणार आहे.
अल्लू अर्जुनच्या आगामी चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाहीये. पण अल्लू अर्जुन आणि त्रिविक्रम यांचा हा चौथा एकत्र चित्रपट असणार आहे. या आधी अल्लू अर्जुनने 'जुली' (2012), 'S/O सत्यमूर्ती' (2015) आणि 'आला वैकुंठपुररामुलू' (2020) हे चित्रपट केले आहेत. या चित्रपटाची घोषणा 2023 मध्ये करण्यात आली होती. ज्याची निर्मिती गीता आर्ट्स आणि हरिका आणि हसीन क्रिएशन्स यांनी केली होती. या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा त्याच्या मजकुरामध्ये 'यावेळी काहीतरी मोठे' असे लिहिले होते. यापूर्वीचे त्यांचे दोन्ही चित्रपट हिट झाले होते. त्यामुळे आता त्यांना आगामी प्रकल्पाकडून खूप अपेक्षा आहे.