Adipurush : 'आदिपुरुष'वरुन भाजप-मनसे आमनेसामने?

सिनेमाच्या टीझरवरुन भाजप प्रवक्ते राम कदम यांनी जोरदार हल्लाबोल केलाय तर मराठी म्हणून या सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत यांच्या पाठिशी उभे आहोत असं मनसेनं ठणकावलंय.

Updated: Oct 7, 2022, 11:53 PM IST
 Adipurush : 'आदिपुरुष'वरुन भाजप-मनसे आमनेसामने? title=

मुंबई : आदिपुरुष सिनेमाच्या (Adipurush) ट्रेलरवरुन रंगलेल्या वादाला आता राजकीय फोडणी मिळालीय. मनसेनं (Mns) मराठी म्हणून या सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊतांना (Om Raut) पाठिंबा दिलाय. तर भाजप प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) या सिनेमाच्या ट्रेलरवरुन चांगलेच खवळलेत. तर ओम राऊत यांनीही आपली भूमिका स्पष्ट केलीय. (adipurush trailesr controversy mns suport to film and bjp ram kadam opposed) 

आदिपुरुष सिनेमावरुन मनसे-भाजप आमनेसामने आलेत. सिनेमाच्या टीझरवरुन भाजप प्रवक्ते राम कदम यांनी जोरदार हल्लाबोल केलाय तर मराठी म्हणून या सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत यांच्या पाठिशी उभे आहोत असं मनसेनं ठणकावलंय. या सिनेमात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. पण रावणाला मुस्लीम लूक दिल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेनं केलाय. आरोप इथेच थांबत नाहीत, रावणाच्या कपाळावर टीळक नाही. 

रावणानं सुरमा घातलाय, हनुमानाला दाढी दाखवण्यात आलीय पण मिशी नाही. हनुमानाचा लूकही मुस्लीम आहे, वानरसेनेला प्लॅनेट एप्सचा लूक आहे, तर प्रभू श्रीरामाच्या रुपात असणा-या प्रभाससाठी व्हीएफएक्सचा अतिवापर झाल्याचा आरोप होतोय. टीकेचा रोख दिग्दर्शक ओम राऊत यांच्याकडे आहे. कालपर्यंत सोशल मीडियापर्यंत मर्यादित असलेल्या वादाला आता राजकीय रंग चढलाय. भाजप प्रवक्ते राम कदम यांनी आदिपुरुषला बॅन करा अशी मागणी केल्यानंतर मराठी माणूस म्हणून आदिपुरूषचा दिग्दर्शक ओम राऊत याच्यासाठी मनसे सरसावलीय. 

आता या सगळ्या वादावर सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनीही झी २४ तासकडे EXCLUSIVE प्रतिक्रिया दिलीय. काही महिन्यांपासून बॉयकॉट बॉलीवूड ट्रेन्ड जोर धरतोय. हिंदू प्रतिकांची मुद्दाम खिल्ली उडवली जातेय असं मोठ्या प्रेक्षकवर्गाला वाटतंय. त्यावरूनच आदिपुरुष सिनेमाही वादात सापडलाय. यावर भाजप आमदार राम कदमांनी दंड थोपटले असले तरी भाजपनं अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे कधीकाळी मनसेत असलेल्या राम कदमांचा आणि मनसेचा सामना रंगणार की भाजपही यात उडी घेणार याकडे लक्ष लागलंय.