IPL 2025 Salman Khan Surprise Announcement: इंडियन प्रिमिअर लीगला अगदी काही महिने शिल्लक राहिले असून मेगा ऑक्शननंतर आता अनेक संघांमध्ये मोठे बदल झाले आहेत. आयपीएलमध्ये अनेक कलाकारांची मालक म्हणून हिस्सेदारी आहे. यामध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खान, जुही चावला, प्रिती झिंटा, शिल्पा शेट्टी यासारख्या कलाकारांचा समावेश आहे. मात्र या कलाकारांमध्ये सलमान खानचा समावेश नसतानाही त्याने नुकतीच एक मोठी घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. इंडियन प्रिमिअर लीग 2025 साठी सलमानने एका संघाचा कर्णधार जाहीर केला असून हा खेळाडू 26 कोटी 75 लाख रुपयांना विकत घेतला आहे. विशेष म्हणजे सलमान ना कोणत्या संघाचा मालक आहे ना कोणत्या संघात त्याची कोणत्याही पद्धतीने गुंतवणूक आहे. तरीही त्याने एक महत्त्वाची घोषणा केल्याचं दिसून आलं.
आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच केकेआरला चषक जिंकून देणाऱ्या खेळाडू यंदाच्या पर्वामध्ये पंजाब किंग्जचं नेतृत्व करेल असं सलमानने जाहीर केलं आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस'च्या पर्वामध्ये आयपीएलमधील तीन स्टार्स पाहुणे कलाकार म्हणून सहभागी झाले होते. यामधील पहिलं नाव होतं सध्या खासगी आयुष्यातील कलहामुळे चर्चेत असलेला युजवेंद्र चहल, दुसरं नाव म्हणजे शशांक सिंग आणि तिसरा खेळाडू तोच ज्याची कर्णधारपदी नियुक्ती झाली. या खेळाडूचं नाव आहे, श्रेयस अय्यर! सलमान खाननेच श्रेयस अय्यर आगामी पर्वासाठी पंजाबच्या संघाचं नेतृत्व करेल, असं जाहीर केलं.
पंजाबच्या संघाने रविवारी म्हणजेच 12 जानेवारी रोजी सोशल मीडियावरुन श्रेयस अय्यर कर्णधार असेल असं जाहीर केलं. यावर श्रेयसनेही पहिली प्रतिक्रिया नोंदवली. "संघाने माझ्यावर विश्वास ठेवला याचा मला अभिमान वाटतोय. संघ व्यवस्थापनाने सोपावलेला विश्वास सार्थकी ठरवत मी संघाला पहिल्यांदा जेतेपद मिळवून देण्यात यशस्वी ठरेल अशी इच्छा व्यक्त करतो," असं श्रेयसने म्हटलं आहे.
#CaptainShreyas #SaddaPunjab #PunjabKings pic.twitter.com/jCYtx4bbVH
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) January 12, 2025
श्रेयसने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मुंबईच्या संघाचं नेतृत्व केलं आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात ही स्पर्धा झाली. मात्र यामधून मुंबई साखळी फेरीतच बाहेर पडली. 30 वर्षांचा श्रेयस आता काय कमाल दाखवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढील महिन्यामध्ये भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. या स्पर्धेत श्रेयस चौथ्या क्रमांकावर खेळणार असल्याची शक्यता आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही श्रेयस चौथ्या क्रमांकावर भारतीय संघांसाठी फलंदाजी करता दिसेल. श्रेयस ऑगस्ट 2024 मध्ये भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला आहे.